Beed : आई-वडीलांच्या शोधात 21 वर्षांची तरुणी थेट फ्रान्समधून (France) बीडच्या परळीत पोहचली आहे. बीडच्या (Beed) परळीतील वैजनाथ मंदिर परिसरात 21 वर्षांपूर्वी एका स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून देण्यात आले होते. या मुलीचे सांत्वन आणि जबाबदारी फ्रान्स येथील कुटुंबांनी घेतली होती. आता 21 वर्षानंतर ही मुलगी आपल्या मूळ जन्मदात्या आई-वडिलांच्या शोधात परळीमध्ये दाखल झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने ती आपल्या आई-वडिलांचा शोध घेत आहे.
अधिक माहितीनुसार, 8 जून 2002 रोजी परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरात टोपलीमध्ये एक लहानगे अर्भक मंदिराचे पुजारी विनायक खिस्ते यांना आढळून आले होते. याची माहिती त्यांनी परळी पोलिसांना दिली. यानंतर हे अर्भक बालकाश्रम पंढरपूर येथे दाखल करण्यात आले. तेथून 29 जून 2002 रोजी प्रीतम मंदिर पुणे या संस्थेत दाखल करण्यात आले. तेथून तिला फ्रान्समधील असंते दांपत्याने दत्तक घेतले. यानंतर तिचं पालन पोषण केले असून, ती मुलगी आज 21 वर्षांची झाली आहे. नेहा आसांते असे तिचे नाव आहे. मात्र, आपल्या लहानपणीची सर्व माहिती जेव्हा तिला आसांते दांपत्याने दिली, तेव्हा तिला आपले आई-वडील कोण आहेत असा प्रश्न पडला. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती आता थेट भारतात आले असून, सध्या ती परळीत पोहचली आहे. आपले जन्मदाते आई वडील कोण आहेत? याचा शोध तिच्याकडून सुरु आहे.
मुलीच्या मदतीला स्थानिक धावून आले...
बीडच्या वकील असलेल्या अंजली पवार या मुलीच्या मदतीला धावून आले आहेत. यासाठी त्यांनी 2020 पासून शोधकार्यास सुरुवात केली आहे. अंबाजोगाईचे दगडू दादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने पुजारी खीस्ते यांचा त्यांनी शोध घेतला. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड देखील शोधण्यात आले. यामुली बाबत ज्यांना कुणास माहिती असेल त्यांनी अंजली पवार यांना संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता या मुलीच्या आई-वडिलांचा शोध लागणार का आणि यात त्यांना कितपत यश मिळते हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
21 वर्षांनी फ्रान्समधून थेट परळीत...
2002 रोजी परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरात टोपलीमध्ये एक लहानगे अर्भक मंदिराचे पुजारी विनायक खिस्ते यांना आढळून आले होते. पुढे या मुलीला फ्रान्समधील कुटुंबाने दत्तक घेतले. आता हि मुलगी 21 वर्षांची झाली आहे. मात्र, आपले जन्मदाते भारतात असून, आपले पालनपोषण करणारे आपले आई-वडील नसल्याचे कळल्यावर मुलीला धक्का बसला. त्यामुळे तिने जन्मदाते आई-वडील यांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती 21 वर्षांनी फ्रान्समधून थेट परळीत पोहचली आहे. आता तिच्या प्रयत्नाला कितपत यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :