Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील आडस गावात एकाने आक्षेपार्ह मजकूर असलेला स्टेटस ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावरुन दोन गटात वाद सुरु झाला. पाहता-पाहता दोन गट थेट आमने-सामने आल्याने वाद आणखीच वाढला. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात यामुळे हाणामारी झाल्याचा प्रकार देखील समोर आला. यामध्ये तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. तर, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण 21 लोकांच्या विरुद्ध धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी 14 जणांना ताब्यात देखील घेतले आहे. तर, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारा मात्र फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
आडस येथे शनिवारी रात्री आरबाज शेख या तरुणाने वादग्रस्त स्टेटस आणि फोटो आपल्या व्हॉट्सअॅपला ठेवले होते. दरम्यान, गावातील इतर समाजातील तरुणांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला जाब विचारला. तसेच त्याला गावातील चौकात आणले. त्यामुळे यावरुन दोन्ही समाजातील लोकं आमने-सामने आले आणि वाद वाढला. पाहता-पाहता थेट हाणामारी सुरु झाली. दोन्ही गटाकडून एकेमकांना करण्यात आलेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले आहे. तर, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ गावात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच दोन्ही गटाला पांगवले. सध्या, गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावात पूर्णपणे शांतता आहे. तर, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
पोलिसांकडून शांततेचे आवाहन
आडस येथे हा प्रकार घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ गावात जाऊन दोन्ही समाजाला शांततेचे आवाहन केले. याला नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वत्र शांतता असून नागरिकांनी अफवांर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. तर गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांच्या भूमिकेमुळे मोठा अनर्थ टळला...
आडस गावात दोन गटात वाद झाला असून, हाणामारी सुरु असल्याची माहिती तेथील हेड कॉन्स्टेबल प्रशांत मस्के यांना कळताच त्यांनी धारूर पोलीस स्टेशनमध्ये याची खबर दिली. पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी तात्काळ आडस येथे धाव दोन्ही गटाला पांगवले. तसेच दोन्ही समाजाची समजूत काढत शांतेतचे आवाहन केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनीही आडस येथे येऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
बीड हादरलं! विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार; पाईप आणि चप्पलने मारहाणही केली