Beed Crime News : बीड (Beed) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका विधवा महिलेवर दोघांनी चालत्या जीपमध्ये बलात्कार (Rape) केला आहे. संतापजनक म्हणजे या महिलेच्या प्रियकरासमोर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी घडली असून, या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गाडीत अत्याचार केल्यावर या महिलेला एका गावात नेऊन दुसऱ्या एका महिलेने पाईप आणि चप्पलने मारहाणही केल्याचा आरोपही पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. 


बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत 26 वर्षीय पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर, ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत बीड शहरात राहू लागली. दरम्यानच्या काळात बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील सुरेश नामदेव लंबाटे याच्याशी पीडित महिलेचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत सुरेशसोबत मागील एक वर्षापासून बीडमध्ये राहतेय. 


दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी पीडिता रोडवरुन पायी जात असताना तिथे चारचाकी गाडी आली. त्या गाडीतून सुरेश लंबाटे खाली उतरला आणि पीडित महिलेला गाडीत बसण्यास सांगितले. त्यामुळे महिला गाडीत बसली. पण, याच गाडीत सुरेश लंबाटे याचा भाऊ अमोल नामदेव लंबाटे आणि बापूराव हावळे बसले होते. तर गाडी काही अंतरावर जाताच अमोल लंबाटे याने महिलेला अचानक मारहाण केली. तसेच तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर अमोल आणि बापूराव यांनी जबरदस्तीने धावत्या जीपमध्ये बलात्कार केला. सोबतच पीडितेला लाथाबुक्क्यांनी आणि चापटाने मारहाण केली. 


प्लास्टिक पाईप आणि चप्पलने मारहाण...


पीडिता महिलेला गाडीत बसवून तिच्यावर अत्याचार केल्यावर थेट सुरेश लंबाटे याच्या सात्रापोत्रा गावातील घरी आणण्यात आले. याचवेळी तिथे सुरेश लंबाटेची पत्नी सविता थांबलेली होती. गाडी घरासमोर येताच सुरेश आणि सविता या दोघांनी मिळून पीडित महिलेस गाडीच्या खाली ओढले. तसेच सविताने प्लास्टिक पाईप आणि चप्पलने पीडित महिलेला मारहाण केल्याची तक्रारीत म्हटले आहे. 


पोलिसांनी केली सुटका...


दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पीडित महिलेची सुटका करत, तिला बीड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश नामदेव लंबाटे, अमोल नामदेव लंबाटे, बापूराव हावळे व सविता सुरेश लंबाटे (सर्व रा. सात्रापोत्रा, ता.बीड) यांच्याविरुद्ध बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Crime News : रस्त्यावर चालणाऱ्यांचे मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या