Beed News: चांगले पर्जन्यमान असूनही सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे आणि शेतीमालाला योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी (Farmers) कर्जबाजारी होत आहेत. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार बीड (Beed) जिल्ह्यात सरासरी दर 30 तासाला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. 1 जानेवारी ते 25 एप्रिल या 115 दिवसांच्या कालावधीत बीड जिल्ह्यात तब्बल 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांपैकी कोणत्याही कुटुंबाला अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही.

बीड जिल्ह्यात कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध नाहीत आणि स्थानिक पातळीवर उद्योगधंद्यांचा अभाव असल्यामुळे सुमारे चार लाखांहून अधिक शेतकरी ऊसतोडीसाठी इतर जिल्ह्यांत स्थलांतर करतात. विविध कारणांमुळे वाढलेले कर्ज हे शेतकरी आत्महत्येच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरत आहे. मागील वर्षी म्हणजेच 2024 साली बीड जिल्ह्यात एकूण 205 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली असून त्यापैकी 175 आत्महत्या सरकारी मदतीस पात्र ठरल्या आहेत.

विभागीय आयुक्तांच्या अहवालातून गंभीर स्थिती उघड 

1 जानेवारी 2025 ते 25 एप्रिल 2025 या 115 दिवसांच्या कालावधीत बीड जिल्ह्यात तब्बल 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजेच सरासरी दर 30 तासाला एका शेतकऱ्याचा बळी जात असल्याचे या सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात (28 दिवस) 25 आत्महत्या तर मार्च महिन्यात (31 दिवस) 27 शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. महसूल विभागाने विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालातून ही गंभीर स्थिती उघड झाली आहे.

शेतकरी आत्महत्या सन 2025

जानेवारी - 19

फेब्रुवारी - 25

मार्च - 27

एप्रिल - 19

एकूण - 90

मराठवाड्यात 2023 साली 1,088 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

2023 मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण 1,088 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून पुढे आली होती. 2022 च्या तुलनेत या आत्महत्यांच्या संख्येत 65 ने वाढ झाली. 2023 मध्ये नोंदवलेल्या एकूण आत्महत्यांपैकी सर्वाधिक 269 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 182, नांदेडमध्ये 175, धाराशिवमध्ये 171 आणि परभणीमध्ये 103 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. जालना, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 74, 72 आणि 42 आत्महत्यांचे प्रकार घडले आहेत. तत्पूर्वी, 2022 मध्ये मराठवाड्यात एकूण 1,023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश होता.

आणखी वाचा 

Beed Crime : धक्कादायक! पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीतील लोकांना मदत करा, बीडमध्ये एकाने निधी गोळा केला, एटीएसला कुणकुण लागली अन्...