बीड : राज्यातील 246 नगरपालिका निवडणुकांची (Election) तारीख जाहीर झाल्याने अखेर 9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे, कार्यकर्त्याची ही निवडणूक नव्या नेत्यांना संधी देणारी ठरणार आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र असल्याने स्थानिक स्तरावर वेगळीच गणितं पाहायला मिळत आहेत. बहुतांश पक्षनेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णयघेण्याचे अधिकार संबंधित पक्षातील नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे, पक्षांतर आणि स्वंतत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी दिसून येत आहे. बीडमध्येही (Beed) महाविकास आघाडी किंवा महायुतीत फूट पडल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का देण्यात आलाय. कारण, विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर यांनी भाजपात (BJP) जाण्याचा निर्णय जाहीर केलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबतीत हेमंत क्षीरसागर यांनीच स्पष्टता दिलीय. आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे. विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपा बरोबर जात असल्याचं क्षीरसागर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. त्यामुळे, भाजपकडून हेमंत क्षीरसागर यांना काय ऑफर आहे आणि त्यांचा पक्षपवेश कधी होतोय, याची उत्सुकता बीडकरांना लागून राहिली आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंतहेमंत क्षीरसागर यांनी त्यांचे बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांना राजकीय जीवनात कायमच साथ राहिली. मात्र, आता सख्खा भाऊच त्यांचा पक्का राजकीय विरोधक बनून मैदानात दिसून येईल. कारण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सख्ख्या भावाकडूनच संदीप क्षीरसागर यांना राजकीय आव्हान मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.
हेमंत क्षीरसागर यांची राजकीय कारकीर्द
विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे हेमंत क्षीरसागर लहाने भाऊ
बीड नगरपरिषदेत हेमंत क्षीरसागर सक्रिय सहभाग
प्रत्येक निवडणुकीत भाऊ संदीप क्षीरसागर यांना हेमंत यांची साथ
बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून यापूर्वी हेमंत क्षीरसागर यांनी कारभार पाहिला होता
आता स्थानिक स्वराज्य संस्थेदरम्यान त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे.