बीड :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात (Beed) 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या (Majalgaon Nagarparishad) इमारतीलादेखील आग लावण्यात आली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. सुमारे 11 कोटींची वसुली आरोपींकडून करण्यात येणार आहे. 


बीड शहर आणि माजलगाव मध्ये झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपीकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल अशी माहिती बीडचे जिल्हा (Beed Police) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.


बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना अटक तर दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. 


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना बीड पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर, 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. 


जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम सुरु


मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागल्याने मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे समोर आले होते. याचवेळी बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे, बीडमध्ये जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बसेचीच मागणी पाहता तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहे. 


बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित? 


बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं, राजकीय पक्षांची कार्यालयही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. कारण  जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :