Beed Rain: मध्यरात्री एक वाजता पाऊस झाला आणि नदीला भयानक महापुर आला.. आम्हाला बाहेर देखील येता आलं नाही.. ही आपबिती सांगत आहेत.. बीडच्या शिरूर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील महिला. घरातील संसार उपयोगी साहित्य महापुरात वाहून गेल्याने स्थानिक महिलांना अश्रू अनावर झाले.आहेत. 'बाळाला दूध पाजण्यासाठी वाटी देखील राहिली नाही.. आमची भयानक अवस्था झाली.. ' हे सांगताना महिलांच्या अश्रूचा बांध फुटला.. एवढीच इच्छा सरकारने आमची मदत करावी.. आम्हाला न्याय द्यावा अशी आर्त हाक इथले नागरिक देत आहेत..दुसरीकडे  NDRF आणि स्थानिक प्रशासनाला तातडीने बोलावण्यात आले असून,धाराशिवमधील भूम परांडा व आंर्मिला येथे बचावकार्य सुरू आहे. 

Continues below advertisement

नेमकी परिस्थिती काय आहे?

विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढले. शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस झाला असून सिंदफना नदीला पूर आला आहे. आणि याच पुराचे पाणी परिसरातील घरांमध्ये दुकानांमध्ये शिरले आहे. शिरूर शहरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही पूरसदृश्य परिस्थिती दिसून येते आहे. घरांसह नदीकाठचे दुकानं सध्या पाण्यात आहे.. 

Continues below advertisement

भूम परांडा येथे बचावकार्य सुरू

दुसरीकडे  NDRF आणि स्थानिक प्रशासनाला तातडीने बोलावण्यात आले असून,धाराशिवमधील भूम परांडा व आंर्मिला येथे बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 48 लोक अडकले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिरापूर गाव, तालुका शिरूर कासार येथे 6 लोक अडकले असून स्थानिक नागरिक त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंदफणा नदीच्या पूरामुळे घरांसह अनेक दुकाने पाण्याखाली आली असून, लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धाराशिवच्या भूम मधील बानगंगा नदीला आलेल्या पुरामुळे चिंचपूर ढगे गावातही हाहाकार उडाला आहे. नदीच्या पुराच्या पाण्यामुळे जनावरे वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे, डांबरी रस्ते खचले असून झाडं उन्मळून पडली आहेत. धाराशिवच्या वडनेर येथे पंधरा ते वीस लोक अडकले होते, त्यांचे रेस्क्यू हेलिकॉप्टरने करण्यात आले. तसेच देवगाव येथील नरसाळे वस्तीतील नागरिकही घरांच्या छतावर अडकून पडले होते आणि त्यांचे रेस्क्यूही तातडीने करण्यात आले.

सध्या काही प्रमाणात पाणी ओसरले असले तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. नागरिक स्वतःच्या प्रयत्नांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन, NDRF आणि हेलिकॉप्टर रेस्क्यू टीमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवले जात आहेत. नागरिक सरकारकडे तातडीने मदतीसाठी मागणी करत आहेत आणि आपत्ती निवारणाची व्यवस्था तत्काळ करण्याची मागणी करत आहेत.