Beed Crime : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घुण हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) हा गेल्या चार महिन्यांपासून फरार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाकरिता एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणातील दोषारोपपत्र देखील दाखल झाले असताना शासन निर्णयानुसार एसआयटी पथकात दोन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Beed Crime News)
'या' दोन अधिकाऱ्यांचा समावेश
पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अनिल मंदे यांचा आता एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून त्याला अटक करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांची मदत होऊ शकते. यामुळेच यांचा समावेश झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये आतापर्यंत झालेला हा तिसरा बदल आहे.
संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे चार महिन्यांपूर्वी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. या प्रकरणाची सुनावणी दि. 10 एप्रिल रोजी विशेष मकोका न्यायालयात न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्या समोर सुनावणी झाली होती. यावेळी आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना अॅड. उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपींनीच रेकॉर्ड केला असून, तो न्यायालयात सादर करण्यात आला आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा व्हिडिओ प्रसारित केला जाऊ नये, अशी विनंती करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. तर वाल्मिक कराड याच्या वतीने सुटकेसाठी (डिस्चार्ज) अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यात त्याचा गुन्ह्यात कोणताही सहभाग नसल्याचे मुद्दे मांडण्यात आले होते. तर आरोपी विष्णू चाटे सध्या लातूर कारागृहात असून, त्याला बीड कारागृहात हलवावे, अशी मागणी त्याचे वकील अॅड. राहुल मुंडे यांनी केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार असून, त्याआधी फॉरेन्सिक पुरावे तपासून ते आरोपींच्या वकिलांना दिले जाणार आहेत. आता 24 एप्रिलच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा