बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. आष्टी तालुक्यातील भाजपा युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी असलेल्या अमोल चौधरी याच्या डोक्यात रॉड घालून त्याला मारहाण केल्याची घटना धामणगाव येथील यात्रेत घडली. गंभीर बाब म्हणजे ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.

अमोल चौधरी याच्यावर सध्या अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकरणाची गंभीर दखल अंभोरा पोलिसांनी घेतली असून त्यांनी जबाब नोंद करुन घेतला आहे. अमोल चौधरी हे राजकारणात सक्रिय असून गावातीलच वादातून त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरच या हल्यामागे कोण आहेत आणि हल्ला कोणत्या कारणामुळे झाला हे समोर येऊ शकणार आहे.

बीडमध्ये 15 दिवसात तीन हत्या

धारूर तालुक्यातील कान्नापूर येथे स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याची जुन्या वादातून हत्या झाली. त्या गावातील संतोष देशमुख नावाच्या व्यक्तीने आणि त्याची पत्नी सोनाली देशमुखने त्यांच्या अन्य साथीदारांसह ही हत्या केली. यानंतर संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख हे स्वतः सिरसाळा पोलिस ठाण्यात हजर झाले होते. ही घटना 30 मार्च रोजी घडली.

अंबाजोगाईतील पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. ही घटना 1 एप्रिल रोजी घडली होती. यामध्ये करडे याच्या गळ्यावर, डोक्यात,पाठीवर वार करण्यात आले होते यात करडे गंभीर जखमी झाला होता. जखमी राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी अंबेजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

माजलगाव येथील बाजार रस्त्यावर बाबासाहेब प्रभाकर आगे (वय 30 वर्षे) हे  दुपारी 2 वाजण्याचा सुमारास उभे असताना आरोपी नारायण शंकर फपाळ याने आगेवर कोयत्याने वार केला. यामुळे आगे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 15 एप्रिल रोजी घडली. घटनेनंतर आरोपी फपाळ स्वतः माजलगाव येथील पोलीस ठाण्यात कोयत्यासह हजर झाला. 

ही बातमी वाचा: