Beed News:बीडच्या पेठ भागातील कापड व्यावसायिक राम फटाले यांनी सावकारी जाच सहन न झाल्याने 2 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक बाब समोर आली आहेत. वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आता या घटनेनंतर राम फटाले आणि मुख्य आरोपी असलेल्या सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्यातील दोन कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडालीय.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तीन आरोपींना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी फटाले यांनी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये सावकारी जाच, दमदाटी आणि मानसिक त्रास यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

काय आहे या रेकॉर्डिंगमध्ये?

तू माझ्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या वडिलांना घेऊन ये तसेच माझी मुद्दल मला दे.. कधी देतोस ते सांग? तू नाही आलास तर मला तुझ्या घरी पोरं घेऊन यावं लागेल.. अशा प्रकारे जाधव धमकावत आहे.

तर दुसऱ्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये दोन रूपये टाकले वरचे चारशे रुपये तुझा बाप टाकणार आहे का?.. अशा प्रकारची भाषा सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव वापरत असल्याचं या कॉल रेकॉर्डिंग मधून समोर आलं. तुला पैसे देणं होत नसेल तर तुझी बायको माझ्या घरी आणून सोड अशा प्रकारची भाषा वापरल्याचा देखील फिर्यादीमध्ये उल्लेख आहे.

अडीच लाखाचं कर्ज, सावकारी तगादा, मानसिक छळ अन् आत्महत्या

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये 10 टक्के व्याजाने उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली. मात्र, पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, असे म्हणत सावकाराने राम फटाले यांचा मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.