Beed Crime News : बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली आहे. यापूर्वी देखील या पोलिसाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती. अमित मधुकर सुतार असं त्याचं नाव असून ते बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी
2024 मध्ये इन्वर्टरसाठी लागणाऱ्या 10 बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेला वर्ष उलटत नाही, तोच सुतार याने आणखी एक कारनामा करत दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आलं आहे.
बॅटरींची चोरी केल्यानंतर अमित सुतार यांचं केलं होतं निलंबन
पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अमित सुतार याचे निलंबन केले होते. तो सध्या जामिनावर बाहेर होता. परंतू, अमित सुतारला ऑनलाइन जुगार, दारु, गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते. काही लोकांकडून कर्जही घेतले हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबवा होता. दरम्यान पोलीसच चोर बनल्याने या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा सुरु आहे.
बीड सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक
बीड जिल्ह्यातील माजलगावमधून (Beed Majalgaon) विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगावच्या माजी नगराध्यक्षांनी सख्ख्या बहिणीची फसवणूक केली आहे. बहिणीचा प्लॉट पत्नीच्या नावे केल्याचा प्रकार घडला आहे. अशोक होके असं फसवणूक करणाऱ्या माजलगावच्या माजी नगराध्यक्षांचे नाव आहे. याप्रकरणी अशोक होके यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सख्ख्या बहिणीच्या नावे असलेला प्लॉट नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करत माजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी थेट आपल्या पत्नीच्या नावावर करुन घेतला आहे. विशेष म्हणजे 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर खोट्या सह्या करून बनावट हक्क सोडपत्र तयार करण्यात आलं आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बहिणीनं थेट पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरुन अशोक होके, त्यांची पत्नी उज्ज्वला होके आणि नगरपालिकेचे तीन तत्कालीन कर्मचारी अशा पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव शहर पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: