बीड : जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेत धक्कादायक प्रकार समोर आला असून, नियमबाह्य काम करून दे अन्यथा तक्रार करून निलंबन करण्याची धमकी देत 15 लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजलगावाच्या नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याला ही खंडणी मागण्यात आली असून, खंडणी मागणारा हा माजी नगराध्यक्ष आहे. तर, या प्रकरणी नगरपालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून या खंडणी मागणाऱ्या माजी नगराध्यक्षाच्या विरोधात माजलगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मंजूर असे या माजी नगराध्यक्षाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, बीडच्या माजलगाव नगरपालिकेमध्ये नामांतर विभागात प्रमुख म्हणून शिवहर शेटे हे काम पाहतात. यावेळी आरोपी शेख मंजूर यांनी नगरपालिकेच्या कार्यालयात येऊन नियमबाह्य काम करण्यासाठी शिवहर शेटे यांच्यावर दबाव टाकला. मात्र, यावेळी हे काम करण्यास शेटे यांनी नकार दिला होता. त्यामुळे, शेख मंजूर यांनी शेटे यांना तात्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या घरी बोलावून घेतले. तसेच आपण सांगितलेले काम न केल्यास निलंबन करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नियमबाह्य काम न केल्यास निलंबन करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर देखील शेटे यांनी अनधिकृत कामे करण्यास नकार दिला. त्यामुळे शेख मंजूर यांनी शेटे यांच्याविरोधात वेगवेगळ्या तक्रारी करायला सुरुवात केली. तसेच, शेटे यांच्या कुटुंबीयांवर देखील दबाव येऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत शेटे यांना या प्रकरणातील सर्व पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारावर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या तक्रारी करून त्रास देण्यास सुरुवात केली.
शेख मंजूर यांनी शेटे यांना आपल्या मर्जीनुसार नियमबाह्य करण्यास सांगितले, पण त्यांनी याला नकार दिला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पण, त्यानंतर देखील शेटे यांनी मंजूर यांचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी मंजूर यांनी वेगवेगळ्या तक्रारी करून त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे शेटे यांचे परिवार भयभीत झाला होता. त्यामुळे, शेटे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी 4 जुलै 2023 रोजी बोलावून घेतले व पुरावे देण्यास सांगितले. त्यानंतर आपण सर्व पुरावे पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात शेख मंजूरविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: