Beed Crime Mahadev Munde : महादेव मुंडे यांची दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील परिसरात निर्घुण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाला 21 महिने उलटून देखील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. या पार्श्वभूमीवर मुंडे कुटुंबीय न्यायासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत वर्षा बंगल्यावर भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.
आतापर्यंत काय-काय घडामोडी घडल्या?
- महादेव मुंडे यांची दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या झाली होती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधानसभेत आवाज उठवणारे आमदार सुरेश धस यांनी परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण सर्वात पहिल्यांदा समोर आणले.
- 24 जानेवारी 2025 रोजी आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुंडे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी निवेदन दिले.
- 25 जानेवारी रोजी अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला, याच दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांचे सीडीआर करण्याची मागणी महादेव मुंडे यांच्या ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून करण्यात आली.
- 27 जानेवारी रोजी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षकांची भेट घेतली.
- 28 जानेवारी रोजी परळी शहर पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचे सर्व कागदपत्र पोलीस उपाधीक्षकांना सुपूर्द करण्यात आले.
- 11 फेब्रुवारी रोजी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडी एसआयटीमार्फत करावा, यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
- 13 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल असणाऱ्या पथकाची तपासण्यासाठी नेमणूक करण्यात आली.
- 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महादेव मुंडे कुटुंबियांची परळीत येत भेट घेतली. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील त्यांच्यासोबत होते.
- 22 फेब्रुवारी रोजी सुरेश धस यांनी महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेत या प्रकरणात त्यांची साथ देणार असल्याचे सांगितले.
- दरम्यानच्या काळात परळी माजलगाव येथे महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी कॅण्डल मार्च देखील काढण्यात आला
- 3 जुलै रोजी विजयसिंह बाळा बांगर यांचा महादेव मुंडे खून प्रकरणात जवाब नोंदवण्यात आला.
- 15 जुलै रोजी वाल्मिक कराड याचे जुने सहकारी असलेले पाटोदा येथील बाळा बांगर यांनी महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली आणि भावाप्रमाणे त्यांच्या या लढ्यात सोबत राहणार असल्याचे सांगितले.
- 16 जुलै रोजी तपास पुढे जात नसल्याचे दिसून येता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला.
- 21 जुलै रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे कुटुंबीयांची परळी येथे येऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्याचे ओएसडी यांना फोन करत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.
- 21 जुलै रोजी महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराड, भावड्या कराड, श्री कराड, गोट्या गित्ते आणि राजेश फड यांचा पीसीआर घेण्याची ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागणी केली.
- 23 जुलै रोजी मुंडे कुटुंबियांनी अंतरवेली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
- 25 जुलै रोजी भर पावसात मुंडे कुटुंबीय आणि कनेरवाडी भोपळा ग्रामस्थांनी चार तास रास्ता रोको केला.
- 29 जुलै रोजी करुणा मुंडे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या न्यायाच्या लढ्यात सोबत असल्याचे सांगितले.
- 29 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महादेव मुंडे कुटुंब यांची भेट घेत संपूर्ण प्रकरण समजावून घेतले आणि त्यांनी राज्यातील तीनही मोठ्या नेत्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले.
- 29 जुलै रोजी महादेव मुंडे कुटुंबीयांना मुख्यमंत्री कार्यालयातून भेटीसाठी फोन करण्यात आला.
- आज 31 जुलै रोजी महादेव मुंडे कुटुंबीय मुख्यमंत्री यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास यासाठी आणि सीआयडी मार्फत करावा, अशी प्रमुख मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे मुंडे कुटुंबीय करणार आहेत. आयपीएस अधिकारी पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनीच या प्रकरणाचा तपास करावा, अशी मुंडे कुटुंबाची मागणी आहे.
आणखी वाचा