Mahadev Munde Death Case: महादेव मुंडे खून (Mahadev Munde Death Case) प्रकरणाला 21 महिने उलटूनही अद्यापही आरोपी फरारच आहेत आणि या प्रकरणात आता एसआयटी आणि सीआयडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मुंडे कुटुंबीयांकडून केली जात आहे. या एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत असावेत याचबरोबर पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा या एसआयटीमध्ये समावेश करून त्यांना या तपासासाठी विशेष अधिकार द्यावेत अशी मागणी मुंडे कुटुंबियांकडून केली जात आहे. कोण आहेत हे दोन अधिकारी? आणि या दोन अधिकाऱ्यांना एसआयटीमध्ये समावेश करण्याची मागणी का करण्यात येतेय?, जाणून घ्या...
कोण आहेत पंकज कुमावत?
- पंकज कुमावत यांनी 2018 साली यूपीएससी परीक्षेत 423 वा रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत महाराष्ट्र केडर मिळाले.
- आयपीएस पंकज कुमावत यांनी केज उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असताना केलेल्या कारवायांमुळे त्यांचा परिचय आहे
- बड्या राजकीय नेत्यांचे गुटख्याचे साठे, पत्त्याचे क्लब उध्वस्त करण्यासह जिल्ह्यातील अवैध गुटखा,क्लब, बायोडिझेल,अशा कारवाया पंकज कुमावत यांनी केज मध्ये केल्या होत्या
- या कारवायामुळे केज परिसरातील माफिया राज संपुष्टात तर आलाच शिवाय दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना त्यांचे नाव ऐकले की धडकी भरत होती.
- पुढे कुमावत यांची पदोन्नती झाल्यानंतर अंबाजोगाई येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची बदली करण्यात आली.
- मात्र अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षकांचा कारभार न घेताच त्यांची अचानकच अमरावती येथे बदली करण्यात आली.
- पंकजा कुमावत यांच्या अंबाजोगाईहून अमरावती येथे बदलीमागे वाल्मीक कराड असल्याचे बोलले जाते,कारण अंबाजोगाई उपविभागामध्येच परळी परिसरातील पोलिस ठाणे येत होते.
- आता सध्या पंकज कुमावत हे अमरावती ग्रामीण पोलीस ठाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहतात.
संतोष साबळे कोण आहेत?
- संतोष साबळे हे स्थानिक गुन्हे शाखा बीड चे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते
- साबळे यांची पुढे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली करण्यात आली.या बदलीमागे देखील वाल्मीक कराड असल्याचे परिसरात बोलले जाते
- पुढे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांचे प्रकरण समोर आणले
- महादेव मुंडे प्रकरणात बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विशेष स्थानिक पथकाची नियुक्ती केली याचे प्रमुख संतोष साबळे होते.
- संतोष साबळे यांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचे अनेक धागेदोरे उलगडून यातील आरोपींचे नावे समोर आणल्याची मुंडे कुटुंबीयांची माहिती आहे.
- सध्या संतोष साबळे हे जालना ग्रामीण येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतायेत
- याच कारणांमुळे मुळे विशेष पथकात पोलिस निरीक्षक संतोष साबळे पाहिजेत असा आग्रह मुंडे कुटुंबियांकडून वारंवार करण्यात येत आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना-
परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्याकांडाला तब्बल 21 महिने उलटले तरीही आजवर दोषींना अटक झालेली नाही. त्यामुळे अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज (30 जुलै) ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबियांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.यापूर्वीही त्यांनी न्याय मिळवण्यासाठी टोकाचे पावले उचलली होती. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट होणार असून, 21 महिन्यांतील व्यथा त्यांच्यासमोर मांडली जाणार आहे. ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे नेमकी कोणती मागणी करतील, आणि फडणवीस या प्रकरणी काय निर्णय घेतात,याकडे सबंध राज्याचं लक्ष लागलेलं आहे.