बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची पडसाद उमटू लागले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी एकूण आठ आरोपींपैकी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. तसेच केज पोलीस स्टेशन गाठत त्यांनी पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे : बजरंग सोनवणे
बीडच्या केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणाचे सबंध जिल्हाभरात पडसाद दिसून येत आहे. अशातच आज खासदार बजरंग सोनवणे यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेतली. सुरुवातीला या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी सोनवणे यांनी केली होती. आज कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर केवळ चौकशी नाही तर देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
दरम्यान, मयत सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खून करण्यात आल्यानंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बजरंग सोनवणे यांनी मयत संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर केस पोलीस स्टेशन गाठून पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला. आरोपींवर तात्काळ कारवाई करा, मुख्य सूत्रधार शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही, असा दम बजरंग सोनवणे यांनी पोलिसांना दिला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत आश्वासन दिल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे हे पोलीस स्टेशन बाहेर पडले.
नेमकं प्रकरण काय ?
काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
बजरंग सोनवणेंनी केली होती सीआयडी तपासाची मागणी
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे वर्ग झाला आहे. केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले असून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल बीडचे पोलीस अधीक्षक यांनी पाठविण्यात आला आहे.
आणखी वाचा