बीड : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असे गट पाहायला मिळत आहेत. दरम्यान शरद पवारांकडून अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बीडमध्ये अशीच सभा घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून देखील बीड (Beed) जिल्ह्यात उत्तर सभा घेतली जात असून, यातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सभेत अजित पवार गटातील अनेक महत्वाचे नेते आणि मंत्री सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) एकूण 9 मंत्री एका व्हॅनमधून सभास्थळी दाखल होणार आहेत. 


बीडमध्ये आज होणाऱ्या जाहीर सभेमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एकाच व्हॅनमध्ये बसून येणार आहेत. चारही बाजूने सजवलेल्या या व्हॅनमध्ये अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांच्यासह धनंजय मुंडे असणार आहेत. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होणाऱ्या जाहीर सभेपूर्वी रॅली काढली जाणार आहे. त्यामुळे या निमित्ताने अजित पवार गटाकडून बीडमध्ये आज जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


सभेसाठी जय्यत तयारी


उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड शहरात पहिल्यांदाच येत असून, बीड शहरांमध्ये अजित पवार यांच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील 24 तासांपासून या ठिकाणी मंडप उभारणी आकर्षक सजावट करणे अशी कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या सभेसाठी साडेसात ते आठ हजार कार्यकर्ते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सभेच्या निमित्ताने अजित पवार बीडवासियांसाठी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. 


अजित पवार काय बोलणार? 


काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली आणि त्याचवेळी धनंजय मुंडे यांच्याकडून देखील अजित पवारांच्या सभेची घोषणा करण्यात आली. परंतु, शरद पवार यांनी बीडच्या सभेत धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजच्या सभेत अजित पवार नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष होतं. परंतु, तीन दिवसांपूर्वी अजित पवार गटाकडून सभेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आणि यामध्ये ही उत्तर सभा नसून उत्तरदायित्व सभा असल्याचं सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बीडच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित कामांची आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामुळे आजच्या सभेत अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Political Sunday : मराठवाड्यात आज 'सभांची जत्रा', सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून झाडल्या जाणार आरोपांच्या फैऱ्या