Beed Election : बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही क्षीरसागरांना संधी दिली, मला फक्त पाच वर्षे संधी द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये झालेल्या सभेतून केलं. बीडच्या विकासासाठी अजित पवार जीवाचं रान करेल, चांगली संधी तुम्हाला चालून आली आहे अशी साद अजितदादांनी बीडकरांना घातली. दरम्यान, राष्ट्रवादी सोडून नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर देखील अजित पवारांनी थेट टीका केली.
बीड शहर जिल्ह्याचे ठिकाण अनेक वर्षांपासून एका घराण्याची मक्तेदारी आहे. त्यातूनच कोणीतरी नगराध्यक्ष व्हायचा. मात्र बारामतीच्या धरतीवर बीडचा विकास करू असा शब्द अजित पवारांनी यावेळी दिला. बीडमध्ये कुणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी पवारांनी दिला.
Ajit Pawar Beed Speech : पक्ष तुमच्या काकाचा आहे का?
अजित पवारांनी योगेश क्षीरसागरांवर जोरदार टीका केली. 53 उमेदवार निवडणुकीसाठी उभे करण्यासाठी मला एबी फॉर्म द्या अशी मागणी करण्यात आली. मात्र पक्ष तुमच्या काकाचा आहे का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित करत क्षीरसागरांवर निशाणा साधला. उमेदवारी देताना चार चौघांशी चर्चा करावी लागते, शंका आली तर पोलिसांकडून रिपोर्ट मागवतो. आता आम्ही दिलेले उमेदवार कुठे चुकले तर मला विचारायचं असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar On Yogesh Kshirsagar : अशा लोकांच्या हाती सत्ता का देता?
मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तेव्हा पाहिले की सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच खड्डे होते. तुम्ही असल्या लोकांच्या हातात कशी सूत्रं देता? चांगल्या लोकांच्या हातात सत्ता का देत नाही? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे या नायब तहसीलदार आहेत, त्यांना एकदा संधी द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
बीड शहर रोजच्या रोज झाडले जात नाही. आठ दहा दिवसांनी पाणी मिळते, असल्या लोकांच्या पाठीशी तुम्ही होता. भ्रष्टाचाराने पोखरलेलं आणि जाऊ तिथे खाऊ असे वेगळेच राजकारण आहे. या लोकानी बीडचं वाटोळं केलं. पाणीपुरवठ्याच्या योजना आणल्या, त्यात देखील भ्रष्टाचार केला. त्या चांगल्या केल्या असत्या तर बीडकराना पाणी मिळालं असतं. ज्यांच्या हातात बीडची सूत्रं त्यांनी त्याचे वाटोळे केलं. पण मी आता ही परिस्थिती बदलणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
ही बातमी वाचा: