बीड :  दुष्काळी (Drought) अनुदान आणि पिक विम्याच्या (Crop Insurance) मागणीसाठी बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळत नाही, तसेच  पिक विम्याचे देखील पैसे जमा होत नसल्याने किसान सभेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा जिल्हा असलेल्या बीडमध्येच शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. 


महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळी अनुदान आणि पीक विम्याच्या प्रश्नावरून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या दरम्यान बळीराजाची मिरवणूक देखील काढण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यात या दोन्ही पिकाला जास्तीचा भाव मिळत असल्याने आणि त्यात घट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर, पाण्याची उपलब्ध नसल्याने रब्बी हंगाम घेणे देखील शेतकऱ्यांना शक्य नसल्याने सरकारने तात्काळ उर्वरित पीक विमा आणि शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्याची मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.


राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी...


छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. यावेळी, मोर्चामध्ये शेतकरी टाळ आणि मृदुंग घेऊन सहभागी झाले होते. तर सरकारला जागा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भजन आणि कीर्तनाचा आयोजन देखील किसान सभेच्या वतीने करण्यात आले. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत केली जाईल असा आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सरकारने आपला शब्द पाळला नसल्याने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. 


कृषी मंत्र्याच्या जिल्हा...


मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. बीड जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, असे असतांना सरकराने दिवाळीत दुष्काळी अनुदान जमा करण्याचे आश्वासन देऊन देखील मदत मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे बीड जिल्हा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा आहे. असे असतांना शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान आणि पीक विम्याच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agriculture News : साहेब विम्याचे पैसे मिळाले, आता दिवळी साजरी करा; कृषीमंत्री मुंडेंना शेतकऱ्याची भावनिक साद