Beed News : बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर आल्याचे पहावयास मिळाले आहे. हत्येचा प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल दीडशे आरोपींना तंबी देण्यात आली आहे. सर्वच आरोपींना पोलिस अधीक्षक कार्यालयात आज(18 फेब्रुवारी) बोलाविण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दुसऱ्यांदा गुन्हे करू नका, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी समज दिली.
आधी वाळू माफिया, त्यानंतर कुख्यात गुन्हेगारांना तंबी देण्यात आल्यानंतर आज कॉवत यांनी कलम 307 म्हणजेच हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना धडकी भरविली आहे.
बीड जिल्हा कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
बीडच्या जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. याच कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि मकोका अंतर्गत कारवाई केलेला वाल्मीक कराड कोठडीत आहे. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच अनुषंगाने सोमवारी पोलीस अधीक्षकांच्या टीमने या संदर्भात आढावा घेतला आहे. दहा ते बारा बाबींवर कारागृहाचे ऑडिट होणार आहे. बीड जिल्हा कारागृह निजामकालीन असून इमारत कमकुवत आहे. कारागृहातील सीसीटीव्हीचे नूतनीकरण करण्याचेच आहे. त्याबरोबरच सुरक्षा यंत्रणा देखील अद्यावत गरजेचे असल्याचं यात म्हटले आहे.
बीड प्रकरणातील जवळजवळ सर्व आरोपींना अटक- मंत्री पंकज भोयर
बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. यावर मंत्री पंकज भोयर यांना विचारले असता या प्रकरणातील जवळजवळ सर्व आरोपीना अटक झालेली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तर या प्रकरणावर गृह विभाग अत्यंत गंभीर असून योग्य पद्धतीने चौकशी सुरू आहे. अशी प्रतिक्रिया मंत्री भोयर यांनी दिली.
सुरेश धस यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, कारण काय?
राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील त्या वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. मुंबईतील पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही चौकशी व्हावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे. निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्षे बीडमध्ये कार्यरत असल्याचा आरोप सुरेश धसांनी यावेळी केला आहे. काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचे ही धस यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या