Beed Crime News : बीडमध्ये तब्बल 28 कोटी 72 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या मा. जिजाऊ मल्टीस्टेट  (Maa Saheb Jijau Multistate Bank Scam Case)  या बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे (Anita Shinde) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offences Branch) पोलिसांनी अटक केली आहे. अनिता शिंदे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड शहरातील मा. जिजाऊ मल्टीस्टेट या बँकेनं जास्तीच्या व्याजदराचं आमिश दाखवून अनेकांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आपल्या बँकेत ठेवून घेतल्या होत्या आणि जेव्हा पैसे परत देण्याची वेळ आली, तेव्हा बँक आर्थिक संकटात सापडल्याचा बहाणा बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी केल्यानंतर ठेवीदारांच्या तक्रारीवरून बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बँक सील करून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास करून बँकेच्या अध्यक्ष अनिता शिंदे यांना अटक केली आहे. अटक करून त्यांना बीडच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत. तर यामध्ये संचालक मंडळाचा सहभाग असल्यास त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करणार आहेत. 


ठेवीदारांची पोलिसांत धाव 


बीडमध्ये ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे आणि त्यांचे पती बबन शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बँकेत 136 ठेवीदारांच्या 100 कोटींच्या वर ठेवी असून बँकेतील पैसे परत मिळत असताना ठेवीदारांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बीड शहरातील राजीव गांधी चौकामध्ये असलेल्या जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेमधील व्यवहार काही दिवसांपासून ठप्प झाला होता. त्यानंतर बँक दिवाळखोरीत निघाल्यानं ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर ठेवीदारांनी बँकेत गर्दी करायला सुरुवात केली. मात्र बँकेकडून पैसे मिळत नसल्यानं संतोष जगताप यांच्या फिर्यादीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


प्रकरण नेमकं काय? 


लोकांना जास्त व्याजदराचं प्रलोभन दाखवून माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटनं ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या. बँकेच्या अध्यक्ष आणि त्यांचे पती तथा संचालक असणाऱ्या बबन शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्या. त्यानंतर इतर ठिकाणी यामधील काही पैसा खर्च केला. यासह विविध ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला.


जेव्हा ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या मुदती संपल्या. त्यावेळी बँकेकडे ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत देण्यास पैसेच नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठेवीदारांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, अशी उत्तरं देऊन धुडकावून लावलं जात होतं. पण सातत्यानं अशीच उत्तरं मिळत असल्यामुळे अखेर ठेवीदारांच्या तक्रारीवरुन बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे, त्यांचे पती बबन शिंदे, मनीष शिंदे, अश्विनी सुनील वांढरे आणि बँकेचे सर्व कार्यकारी मंडळावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणात अखेर पोलिसांनी बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे यांना अटक केली.