Tips On Car Driving: घाटात गाडी चालवणं अनेकांना कठीण वाटतं. काही जण तर सरळ रस्त्याप्रमाणंच घाटात गाडी चालवतात. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. डोंगरांमध्ये गाडी चालवताना काय लक्षात ठेवाल, काय काळजी घ्याल, याबद्दल सगळं सांगणारा लेख... 


चढावर 


1. गिअरचं गणित 


सपाट रस्त्यावर कार ताशी 7-8 किमी वेगात असताना आपण दुसरा गिअर टाकतो. मात्र घाट चढताना इंजिनवर अधिक ताण येतो, त्यामुळे ताशी 10-15  किमीच्या वेगाला देखील अनेकदा कार पहिल्या गिअरमध्ये ठेवावी लागते. 


2. ओव्हरटेकची घाई नको 


वळणांवर समोरचं वाहन दिसत नाही. संयम ठेवा, वळणावर अजिबात ओव्हरटेक करू नका. 


3. अंतर वाढवा 


तुमच्या आणि समोरच्या गाडीत अधिक अंतर ठेवा. खासकरून जर पुढे ट्रक किंवा बस असेल, आणि चढावर थांबावं लागलं तर पुन्हा वेग घेताना पुढचं वाहन थोडं मागे येण्याची शक्यता असते. 


4. बचावात्मक ड्रायव्हिंग गरजेचं 


तुम्ही जरी ओव्हरटेक करत नसाल तरी समोरून येणाऱ्या वाहनाचा चालक मूर्ख असू शकतो. त्यामुळे गाडी डावीकडे ठेवा, आणि कधीही ब्रेक लावण्याची गरज पडू शकते हे ध्यानात ठेवा.


5. 'क्लस्टर'चा भाग बनू नका


अनेकदा लोक 4-5 गाड्यांचा समूह बवनून ओव्हरटेक करत सुटतात. तसं करू नका. पहिल्या वाहनांनं ब्रेक लावला तर मागची सर्व वाहनं धोक्यात येतात. असा समूह बनवणाऱ्यांना आधी पुढे जाऊ द्या, तुम्ही सावकाश जा. 


6. नवीन चालक असाल तर...


नुकतीच गाडी शिकला असाल तर लगेचच घाटात ड्राईव्ह करू नका. अनुभवी व्यक्तीकडून आधी शिकून घ्या, मग त्यांच्या देखरेखीखाली घाट चढायला शिका. 


उतारावर


1. वेग नियंत्रण 


उतारावर वेग आपोआप वाढतो आणि ब्रेक तुलनेनं हळू लागतो. कारण गुरुत्वाकर्षणामुळे ब्रेकवर अधिक ताण येतो. 


2. घाट चढणाऱ्याला प्राधान्य 


वळणावर दोन गाड्या समोरासमोर येत असतील तर चढणाऱ्याला पहिलं प्राधान्य असतं. म्हणून, 'मीच पहिले जाणार' या वृत्तीनं गाडी चालवू नका. 


3. अवजड वाहनांचा 'टर्न' मोठा


अवजड वाहनांना वळण्यासाठी अधिक जागा लागते, त्यामुळे वळणावर अनेकदा ते समोरच्या लेनमध्ये शिरतात. तसं ते मुद्दामहून करत नाहीत, ती त्यांची गरज आहे. त्यामुळे ट्रक वळत असेल तर उतारावर आधीच गाडी थांबवा. 


4. अवजड वाहनांची गरज समजून घ्या 


अवजड वाहनांना थांबावं लागेल असं काही करू नका. कारण त्यांच्या प्रचंड वजनामुळे त्यांचा ब्रेक निकामी होऊन ते वाहन मागे जाऊ शकतं. 


5. उताविळांना पुढे जाऊ द्या 


आपल्याकडे अनेक चालकांना विनाकारण घाई असते. असले मूर्ख तुमच्या मागे असतील तर त्यांना पुढे जाऊ द्या. अहंकाराचा मुद्दा बनवून त्यांच्याशी शर्यत लावू नका. घाट हे शर्यतीचं ठिकाण नाही, हे लक्षात ठेवा. 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI