Maruti Suzuki : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki)  बुधवारी (18 जानेवारी) तब्बल 17 हजार गाड्या परत बोलवल्या आहेत. काही गाड्यांच्या एयरबॅग कंट्रोलरमध्ये बिघाड झाल्याने या गाड्या परत बोलवल्याची माहिती समोर आलेली आहे. कंपनीने परत बोलवलेल्या गाड्यांमध्ये अल्टो (Alto K10), ब्रेजा (Brezza), बलेनो (Baleno), एस प्रेसो (S-Presso), एको (Eeco) आणि इतर गाड्यांचा समावेश आहे.  


रॉयटर्सच्या माहितीनुसार, परत मागवण्यात आलेल्या गाड्यांच्या एअरबॅगमध्ये काही दोष आहेत. हे सुधारण्यासाठी कंपनीने गाड्या परत बोलावल्या आहेत. या कारचे उत्पादन 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान झाले. परत बोलवलेल्या गाड्या दुरुस्त करण्यात येणार आहेत. मारुती सुझुकीने एकूण 17,362  गाड्या परत बोलवल्या आहेत. 


....तोपर्यंत गाड्या वापरु नका : मारुती सुझुकी


मारुती सुझुकीने या गाड्या न चालवण्याचा सल्ला देखील दिला आहे. मारुती सुझुकी कंपनीने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, या सर्व कारमधील एअरबॅग कंट्रोलरची तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास ते बदलण्यात देखील येणार आहे. यासाठी कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परत बोलवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये काही दोष आहेत. अनपेक्षित घटनांमध्ये आपला जीव वाचण्यासाठी कारमध्ये सीटबेल्ट लावणे आवश्यक आहे. मात्र परत बोलवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीट बेल्ट लावले तरी एअरबॅग उघडण्यात अडचणी येत असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे कंपनीने या गाड्या परत बोलावल्या आहेत. गाड्यांमध्ये असलेला बिघाड जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत गाड्या न वापरण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.  


अफवांवर विश्वास ठेवू नका, अडचण-शंका असल्यास शोरुमला भेट द्या : मारुती सुझुकी


कंपनीने पुढे म्हटले आहे की, भविष्यात ग्राहकाला कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परत बोलवण्यात आलेल्या गाड्या न वापरण्याचे आवाहन मारुतीने केले आहे. मारुती सुझुकीच्या ज्या गाड्या परत बोलवण्यात येणार आहेत अशा ग्राहकांना कंपनीमधून मेसेज करण्यात येईल. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच काही अडचण किंवा शंका असल्यास कंपनीच्या अधिकृत शोरुमला भेट देण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. 


कार परत बोलवण्याची ही पहिली वेळी नसून या अगोदर देखील कंपनीने कार माघारी बोलावल्या होत्या. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कारच्या सीटबेल्टमध्ये बिघाड असल्याने कंपनीने सुमारे 5000 वाहने परत बोलवल्या होत्या. तर डिसेंबरमध्ये कारमधील पुढील सीटच्या सीट बेल्टच्या  दोष आढळल्याने 9,125 वाहने परत बोलावली होती.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI