नवी दिल्ली : गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये देशातील वाहनांची एकूण विक्री आठ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. परंतु कोविडच्या आधीच्या पातळीपेक्षा अजूनही सात टक्के कमी आहे. वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने अर्थात (FADA) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 


फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2022 मध्ये देशभरात एकूण 15,21,490 वाहनांची विक्री झाली होती, जी मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये 14,04,704 होती. त्यानुसार ऑगस्टमध्ये वाहनांच्या एकूण विक्रीत 8.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु कोविड-19 महामारीपूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2019 च्या तुलनेत ती अजूनही सुमारे 7 टक्के कमी आहे.


प्रवासी वाहन विक्रीत वाढ


फाडाच्या आकडेवारीनुसार या वर्षी ऑगस्टमध्ये पॅसेंजर व्हेइकल्स (PV) ची किरकोळ विक्री 2,74,448 होती, जी ऑगस्ट 2021 मध्ये 2,57,672 होती. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी याच कालावधीत पीव्हीच्या विक्रीत 6.51 टक्के वाढ झाली आहे. 


पण एक मनोरंजक आकडेवारी अशी आहे की ऑगस्ट 2022 मध्ये पीव्हीच्या विक्रीत कोविडच्या आधीच्या वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत म्हणजेच ऑगस्ट 2019 नंतर 40 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे यंदा सणासुदीच्या काळात वाहनांची मागणी झपाट्याने वाढणार असल्याचे या तेजीवरून दिसून येते. 


ऑगस्ट 2022 मध्ये दुचाकींची किरकोळ विक्री 10,74,266 होती. तर गेल्या वर्षी ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 9,89,969 होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी याच कालावधीत दुचाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत 8.52 टक्के वाढ झाली आहे.


यावर्षी ऑगस्ट महिन्यात तीनचाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत सर्वाधिक 83.14 टक्के वाढ झाली असल्याचं फाडाने सांगितले. तीनचाकी वाहनांची किरकोळ विक्री ऑगस्ट 2021 मध्ये 30,748 युनिट्सच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये 56,313 युनिट होती. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्ये 24.12 टक्क्यांच्या वाढीसह व्यावसायिक वाहन (CV) विक्री 67,158 युनिट्सवर पोहोचली. तर ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 54,107 युनिट होता. 


ऑगस्टमधील किरकोळ विक्री उत्साहवर्धक नव्हती आणि डीलर्स अधिक अपेक्षा करत होते. गणेश चतुर्थीपासून सणासुदीची सुरुवात चांगली होईल, अशी अपेक्षा एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी व्यक्त केली.





Car loan Information:

Calculate Car Loan EMI