मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्त्वात आज मुंबईतील चुनाभट्टी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी करण्यात आली.
पोलिसांना निवेदन दिल्यानंतर सुप्रिया सुळे, "माणुसकीच्या नात्याने आम्ही पीडित कुटंबाच्या मागे उभे आहोत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. गृहखात्याचं काम दुर्दैवी आहे, जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा."
तर नवाब मलिक यांनी या प्रकरणावरुन पोलिसांना जबाबदार ठरवलं आहे. "चेंबूरमधील बलात्कार प्रकरणात पोलिस यंत्रणेचं दुर्लक्ष झालं आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. तसंच चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी," अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
कुटुंबीयांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
दरम्यान बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. अत्याचाराच्या घटनेला महिना उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. दरम्यान तरुणीच्या मृत्यूला 24 तासांपेक्षा जास्त अवधी उलटून गेला मृतदेह अद्याप औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातच आहे.
मुंबईत गँगरेप झालेल्या जालन्यातील तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी, राज्यभरात संताप
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद येथील घनसावंगी तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी 7 जुलै रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. घाबरलेल्या तरुणीने अत्याचाराबाबत कोणालाही माहिती दिली नव्हती.या तरुणीचे भाऊ मुंबईतील चेंबूरमध्ये राहतात. दोन महिन्यांपूर्वी ही तरुणी भावाच्या घरी आली होती. तेव्हापासून ती तेथेच राहत होती. 7 जुलै रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असं घरी सांगून ती घराबाहेर पडली. मात्र नंतर तिच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केले. संध्याकाळी घरी परतली तेव्हा ती आजारी पडली आणि तिचे पाय कापत होते. पॅरॉलिसिस झाला असावा, असं सांगून भावाने गावाकडे असलेल्या वडिलांना फोन करुन बोलावून घेतलं. नंतर गावी उपचार करु, असं म्हणत तिला 17 जुलै रोजी जालन्याला गेले.
तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी तिला 25 जुलै रोजी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी उपचारांची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली तेव्हा तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाला असावा, असा अंदाज आला. त्यांनी ही बाब तिच्या पालकांना सांगितली. आई-वडिलांनी या मुलीला याबाबत विश्वासात घेऊन विचारले असता तिने चार जणांनी चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचं सांगितलं. यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती. परंतु ही घटना मुंबईच्या चेंबूर आणि चुनाभट्टी परिसरातील असल्याने हा गुन्हा चुनाभट्टी पोलिस स्टेशनमध्ये वर्ग केला आहे.
चुनाभट्टी पोलिसांवर आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप
या प्रकरणात तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. तरुणीचा मृत्यू झाला, आरोपींची नावं देऊनही त्यांना अटक केली जात नाही, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. या आरोपांवर चुनाभट्टी पोलिसांनी आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणात अद्याप ठोस पुरावे मिळालेली नाही. मात्र लवकरच आरोपींना पकडू. आम्ही तपास करत आहोत, असं स्पष्टीकरण चुनाभट्टी पोलिसांनी दिलं आहे. तर दुसरीकडे चुनाभट्टी पोलिस ठाण्याबाहेर मात्र विविध पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
आरोपी सुटणार नाहीत, फाशीचीच शिक्षा होईल : दीपक केसरकर
दरम्यान, आरोपी फरार जरी असले तरी कुठलाही आरोपी सुटू शकत नाहीत. पोलिस दल आरोपींचा सक्षमपणे शोध घेईल. अशा क्रूर घटनेने जनतेच्या मनात जनप्रक्षोभ निर्माण होतो. आरोपींना पकडण्यासोबत बलात्काऱ्यांना शिक्षा होणं महत्वाचं आहे. या प्रकरणातील आरोपी सुटणार नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा होईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं. पोलिसांची वेगवेगळी पथकं नेमून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीरामपूर इथल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील गँगरेप प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास करा, राष्ट्रवादीची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2019 01:39 PM (IST)
बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. अत्याचाराच्या घटनेला महिना उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -