औरंगाबाद : उस्मानाबाद आणि नांदेडमधील सोयाबीन पीकविम्याचे पैसे पाच आठवड्यांच्या आत देण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मंत्रीमंडळ उपसमीतीने 3 आठवड्यांत बैठक घेऊन निर्णय घ्यावा आणि त्यानंतर 2 आठवड्यांच्या आत पीकविम्याचे पैसे वाटप करावे, असे कोर्टाने सांगितले आहे. याप्रकरणी उस्मानाबादेतील शेतकऱ्यांनी औंरगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. त्यावर आज (15 जुलै) सुनावणी झाली.


उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना वर्ष 2016-17 सालचा पीकविमा मिळाला नव्हता. अधिक उत्पन्नाचे कारण दाखवत तो देण्यात आला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी ही अधिकाऱ्यांची चूक असल्याचे सांगत 56 कोटींचा विमा शेतकऱ्यांना मिळेल असे आश्वासन दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही पीकविम्याचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांनी कोर्टात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचाही उल्लेख केला. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.