औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीपूर्वी हार्ट अटॅक येऊन मी मेलो का नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. आपल्या पराभवावर बोलतांना खैरे म्हणाले की, शिवसेनेत संघटनात्मक बदलाची गरज आहे. ज्यांना मी मोठं केलं त्या सर्वांनी आज माझ्या विरोधात काम केलं, याचं वाईट वाटत आहे.
शिवसेनेला पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टर हे चिन्ह कारणीभूत होते. त्या ट्रॅक्टरवर शिवसेनेतील अनेक जण बसले. आता त्यांना माफ करु, कारण असे केले नाही तर समाजात दुही निर्माण होईल, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
हर्षवर्धन जाधवांवर गंभीर आरोप
लोकसभा निवडणुकीत विरोधात अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांवर चंद्रकांत खैरेंनी गंभीर आरोप केले. हर्षवर्धन जाधव यांनी वडिलांची आणि भावाच्या पत्नीची हत्या केली. हर्षवर्धन जाधव यांनी पत्नीचाही छळ केला, मारहाण केली. हर्षवर्धन यांच्या विरोधात त्यांची पत्नी रावसाहेब दानवे यांची मुलगी पोलिसातही गेली होती. अशा लोकांना शिवसैनिकांनी मदत केली आणि पाप केलं असं चंद्रकांत खैरे म्हणाले.