Sandipan Bhumre: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये शिवसंवाद यात्रा काढत बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात सुद्धा आदित्य ठाकरेंनी रॅली काढत सभा घेतली. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या सभेला कशी गर्दी झाली याबाबत एका शिवसैनिकांने भुमरे यांना फोनवरून माहिती देताच ते त्याच्यावर चांगलेच भडकले. याबाबत भुमरे आणि एका शिवसैनिकाची संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र याची खात्री एबीपी माझा करत नाही. 


काय आहे ऑडीओ क्लिपमध्ये...


वायरल होत असलेल्या क्लिपमध्ये स्वतःला शिवसैनिक सांगणारा एक तरुण, आदित्य ठाकरे यांची पैठणमध्ये निघालेल्या शिवसंवाद रॅलीची भुमरे यांना माहिती देतांना पाहायला मिळाला. आदित्य यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, तुम्हाला मतदान करणारे लोकं आज आदित्य ठाकरेंच्या सोबत असल्याचं हा तरुण म्हणतो. त्यानंतर तुम्ही असे करायला नको होतं, म्हणताच भुमरे या तरुणावर चांगलेच भडकले. 'उगाच शहाणपणा नको करू, कशासाठी फोन केला तू, औरंगाबादचा आहे ना तू, मी आल्यावर तू ये तुला सांगतो काय आहे ते, असे म्हणत भुमरे चांगलेच संतापले. मात्र लगेच त्यांनी संयमाने बोलत आपणही रॅली काढून म्हणत, तरुणाची समजूत काढत फोन ठेवला. 


आदित्य ठाकरेंच्या रॅलीला मोठी गर्दी....


आदित्य ठाकरे यांनी भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली होती. त्यांच्या याच यात्रेला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. भुमरे याच मतदारसंघातून आतापर्यंत पाच वेळा निवडून आले आहेत. तर ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. मात्र त्यांच्या शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय तालुक्यातील शिवसैनिकांना पटला नसल्याची चर्चा आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर पाहायला मिळाली. 


आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर टीका..


पैठण येथील सभेत बोलतांना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी या लोकांना उमेदवारी दिली, मंत्रीपद दिलं, सरकार आल्यानंतर निधीही दिला. मात्र तरीही त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. यांना बंडखोर म्हणता येणार नाही, तसेच यांनी कोणताही उठाव सुध्दा केला नसून, हे गद्दार आहेत अशी टीका आदित्य यांनी केली. या गद्दारांवर विश्वास ठेवलं हीच आमची चुकी झाली असंही आदित्य ठाकरे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या...


Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या 22 मिनटांच्या भाषणात 31 वेळा 'गद्दार'चा उल्लेख


Photo: आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत आतापर्यंतची सर्वाधिक गर्दी भुमरेंच्या मतदारसंघात, पहा फोटो