औरंगाबाद : शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या एन 2 भागात प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खून प्रकरणात पाच दिवसांनंतरही काहीही उलगडा होवू शकला नाही. खून झाला मात्र कुणी केला याचं उत्तर शोधणं आता पोलिसांसाठीच दिव्य झालं आहे. पोलिस आयुक्तांसह पोलिसांची पथकाला अजूनही कुठलाच सुगावा लागला नसल्यानं नक्की काय घडलंय हे कोडंच आहे. आता मृत राजन शिंदे यांच्या घरापासून 100 मीटरवर असलेल्या विहिरीतील पाणी उपसा केला जात आहे. या विहिरीत पुरावे असल्याचा शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
प्राध्यापक राजन शिंदे यांच्या मारेकर्यांनी रक्ताने माखलेले शर्ट आणि हत्यार या विहिरीत टाकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे. 24 तासांपेक्षा जास्त वेळापासून या विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. असं असल तरी अद्यापही सहाव्या दिवशीदेखील राजन शिंदे यांच्या खुनाचा तपास लागलेला नाही.
राजन शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी कुटुंबियांची 10 तास चौकशी केली. मात्र, त्यातून अजूनही ठोस काही हाती लागलं नसल्यानं खूनाचा गुंता वाढतच चालला असल्याचं दिसंतय. शिंदे यांचा सोमवारी पहाटे राहत्या घरी खून झाला. त्यांच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आले होते तर त्यांच्या पोटावर बसून त्यांच्या हाताच्या नस कापण्यात आल्या होत्या. या निर्घूण खूनानंतर पोलिस आयुक्त स्वतः घटनास्थळी तब्बल 5 तास होतेय मात्र, पाच दिवसानंतरही खूनाचा उलगडा झालाच नाही.
राजन शिंदे यांचा खून अत्यंत प्लॅनिंग करून करण्यात आला. शिंदे खुनाच्या रात्री घरात येताना सीसीटीव्हीत दिसत आहेत, त्यानंतर घरात कुणीही आलेले नाही. पहाटे मुलगा घराबाहेर पडताना आणि नंतर रुग्णवाहीका घरी आल्याचं दिसतंय. जर तिसरं कुणीच आल्याचं दिसत नाही तर खून घरातल्यांनीच कुणी केला का? असा संशय पोलिसांना आहे.
मुलाने वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर घरात एकाही कुटुंबियाला न सांगता थेट पोलिस स्टेशन का गाठले? कुणाला उठवले का नाही? हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. अँबुलन्स आल्यानंतर चालकाने मृतदेह नेण्यास नकार दिला आणि पोलिसांना कळवा असे सांगितले. शिंदेच्या मुलानं बहिणीना घेवून पोलिस स्टेशन गाठले. मात्र, या सगळ्यात आईला का उठवले नाही? असाही सवाल केला जातोय.
याआधीही शहरातील श्रुती भागवत खून प्रकरणाला 6 वर्ष लोटून गेले तरी पोलीस काहीही शोधण्यात असमर्थ ठरले आहेत. याही प्रकरणात आतापर्यंत पोलिसांना काहीही ठोस सापडू शकलं नाही. श्रुती भागवत खून प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांनी तपास केला त्याच अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचाही तपास आहे. त्यामुळं हे ही प्रकरण न उलगडता बंद होते का? असाही प्रश्न आहे. एका प्राध्यापकाचा राहत्या घरात निर्घृण खून होतो आणि 5 दिवस उलटूनही पोलिस यात काहीच करू शकत नाही, म्हणजे कायदा व्यवस्था अस्तित्वात आहे का? असाही सवाल आता सुरु झाला आहे.