Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे शहरासाठी करण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे मुख्यमंत्री यांनी आज बैठकीतून आढावा घेतला. तसेच मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सोबतच औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करतांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले. 


अधिकाऱ्यांची माहिती...


या बैठकीत माहिती देताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी सांगितले की,  मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या कामास वेग देण्यात आला आहे. कंत्राटदाराने सर्व 83.62 किमी डीआय पाईप्स मागविले आहेत. तसेच 780 मी लांबीचे एमएस पाईप्स तयार करण्यात आले असून कोटींगचे काम सुरू आहे. जल शुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभाच्या तराफे भिंतींची कामे वेगाने सुरू आहेत. 160 किमी साठी एचडीपीई पाईप्सचा पुरवठा करण्यात आला आहे. सोबतच 13.04 किमी डीआय पाईप्सचा पुरवठाही कंत्राटदारास करण्यात आला आहे.


केंद्राकडून परवानगी आणा


जायकवाडी धरणातील उद्भव विहीर ( जॅकवेल ) घेण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रधान सचिव वने मार्फत प्रस्ताव सादर केला आहे, त्याला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. मी प्रसंगी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री यांच्याशीही बोलेल. पण ही परवानगी मिळेपर्यंत इतर कामे थांबू देऊ नका. जलकुंभ, पाईप्स कोटींग करणे त्याचबरोबर खोदकाम ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत, मी स्वत: ती कामे पाहणार असल्याच मुख्यमंत्री म्हणाले.


नाकारलेल्या पाईपचा वापर...


राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. प्राधिकरणाने हे काम हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला दिले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी आयएसआय मार्क नसलेले पाइप वापरले जात असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पाइपवर आक्षेप घेतला आहे. मात्र तरीही ते पाइप वापरले जात आहे.