औरंगाबाद : नसीरुद्दीन शाह हे विद्वान माणूस आहेत. त्यांनी प्रश्न विचारला तर त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. प्रत्येकाला आपली जीवन पद्धती जगण्याचा अधिकार आहे. कुणी मतं व्यक्त केली की पाकिस्तानला जा, असं म्हटलं जातं, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.


औरंगाबादच्या वैजापूरमध्ये आज समता परिषदेची सभा झाली. यावेळी सभास्थळी भुजबळ यांच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. यावेळी भुजबळांनी केंद्र आणि राज्यसरकरवर कडाडून टीका केली. संभाजी भिडे यांचं नाव मनोहर मात्र ओबीसींची डोकी भडकवण्यासाठी त्यांच नाव संभाजी ठेवलं असा आरोप देखील त्यांनी केला.


मराठा ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न

मराठा ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकमेकांविरोधात बोलून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही समाजाने तो हाणून पाडला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. ओबीसीला आरक्षण सहज मिळालं नाही, अनेक आयोग आले, लढाई झाली नंतर आरक्षण मिळालं. लोकं कोर्टातही गेले. कोर्टाने विचारले 27 टक्के आरक्षण कसे? आम्ही सांगितलं 1933 च्या जनगणनेच्यानुसार आम्ही 54 टक्के आहोत म्हणून 27 टक्के आरक्षण मिळाले. आता ओबीसीची पुन्हा जनगणना करा आणि त्याद्वारे आरक्षण द्या, अशी मागणीही भुजबळ यांनी केली.


महाराष्ट्र सदन तयार झालं, अमित शहा आता तिथेच बैठक घेतात

माझ्यावर आरोप लावणाऱ्यांनो तुम्ही काही साधू नाहीत, असा चिमटाही भुजबळांनी यावेळी काढला. महाराष्ट्र सदन तयार झालं. अमित शहा आता तिथेच बैठक घेतात. 100 कोटींचे काम आणि साडेआठशे कोटींचा घोटाळा कसा? ज्याने बांधकाम केलं त्याला अजून एक पैसा दिलेला नाही, तर तो कॉन्ट्रॅक्टर मला साडेआठशे कोटी कसे देईल, असेही भुजबळ म्हणाले. तसेच हनुमान कोणत्याही जातीचा असो तुम्हाला काय करायचं, ज्याला वाटेल तो पूजा करेलच असेही भुजबळ म्हणाले.