औरंगाबाद : जिल्ह्यातल्या महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. आकांक्षा देशमुख असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती मुळची बीड जिल्हातील आहे. आकांक्षा मास्टर्स ऑफ फिजिओथेरपी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होती.
आकांक्षा ही एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहातील चौथ्या मजल्यावरील एका रुममध्ये राहत होती. तिच्या रूमपार्टनर तंत्रनिकेतन आणि इंजिनिअरींच्या विद्यार्थिनी असून त्यांची परीक्षा नुकतीच झाल्याने त्या गावी गेल्या होत्या. यामुळे तीन दिवसांपासून आकांक्षा वसतीगृहात एकटीच राहत होती.
आकांक्षाचा मृतदेह आढळल्यानंतर सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु होती. परंतु तिच्या मृतदेहाचे शवविच्छेद केल्यानंतर आलेल्या अहवालात तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगलीतही विद्यार्थिनीची हत्या
दोनच दिवसांपूर्वी सांगलीतदेखील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात शिकणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना आता औरंगाबामध्येदेखील एका विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. सांगलीतील विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात सांगली पोलिसांनी एका प्राध्यापकाला अटक केली आहे. ऋषिकेश कुडाळकर असे या संशयित प्राध्यापकाचे नाव असून खुनाच्या घटनेनंतर तो फरार झाला होता.