औरंगाबाद : मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करत 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. औरंगाबादमधील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून ही मारहाणीची घटना असल्याचं औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.


इम्रान पटेल हा तरुण एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. कामावरून रात्री घरी परतत असताना हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगर येथे आठ ते दहा तरुणांनी त्याला अडवलं. त्यापैकी एकाने इम्रानच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली आणि कुठे राहतो असं विचारलं. त्यानंतर टोळक्याने शिवीगाळ करुन जय श्रीराम बोलण्यास जबरदस्ती केली. इम्रानने जय श्रीराम न म्हटल्याने त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या इम्रानने त्यांच्यासमोर जय श्रीराम म्हटलं.


मात्र त्यानंतरही टोळक्याने त्याला मारहाण केली. दरम्यान आरडाओरडा ऐकून जवळील गणेश नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी घरातून बाहेर आले. त्यांनी टोळक्याच्या तावडीतून इम्रानची सुटका केली. घटनेनंतर घाबरलेल्या इम्रानने आज बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


केवळ मारहाणीची घटना असल्याची पोलिसांची माहिती


मात्र अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नसून तरुणाला मारहाण झाल्याची ही घटना आहे. याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे.