Jalna News: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच आज त्यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची अचानकपणे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा देखील झाली. त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्या नाराजीचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.
रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांची आज जालन्यात भेट झाली. तर यावेळी रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्ट्रक्शन कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीत तबल 25 ते 30 मिनिटे गुप्त चर्चा झाली. मात्र या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीची आणि त्यांच्यात झालेली चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. तर याबाबत अमोल कोल्हे यांच्या स्वीय सहायकाशी फोनवर संपर्क केला असता, त्यांनी औरंगाबाद येथे 23 ते 28 दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्य होणार असून, त्याचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली असल्याचं म्हटले आहे.
'त्या' अर्धा तासाची जोरदार चर्चा
अमोल कोल्हे यांनी आज अचानक जालन्यात दानवे यांची भेट घेतली. तर यावेळी यावेळी रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्ट्रक्शन कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अमोल कोल्हे आणि रावसाहेब दानवे यांच्यात एका बंद चारचाकी गाडीत गुप्तपणे अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे या अर्धा तासाची जोरदार चर्चा जालन्यातील राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असेल याबाबत वेगवेगळे अनुमान लावले जात आहे.
नाराजीची चर्चा...
राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते म्हणून खासदार अमोल कोल्हे यांची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून खासदार कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबीराकडेही त्यांनी पाठ फिरवल्याने त्यांच्या नाराजीची अधिकच चर्चा झाली होती. आता त्यांनी दानवे यांची भेट घेतली आहे. तर दोघांमध्ये अर्धा तास चर्चाही झाली आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. मात्र यावर अमोल कोल्हे यांची अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही.