Chhatrapati Sambhajinagar Fire News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) पडेगाव भागातील मिटमिटा परिसरात रविवारी (26 फेब्रुवारी) रात्री 9.50 वाजता अचानक आग (FIRE) लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अंदाजे सात एकरमध्ये असलेल्या एका मंडपाच्या गोडाऊनला ही आग लागली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र आगीचे प्रमाण अधिक असल्याने शहरातील वेगवेगळ्या भागातून एकूण 10 अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल दीड तासाने म्हणजेच 11.20 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाले. 


रविवारी रात्री 9 वाजून 50 मिनटाला अग्निशमन दलाला पडेगाव भागातील मिटमिटा परिसरात असलेल्या जाधव मंडपच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. मात्र अंदाजे सात एकर परिसरात असलेल्या मोठ्या गोडाऊनला ही आग लागल्याने आगीचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे आणखी अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. घटनास्थळी पदमपूरा अग्निशमन दलाच्या 5, सिडको 1, चिखलठाणा 1, वाळूज MIDC 1, बजाज 1, गरवारे 1 अशा एकूण दहा गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. तर अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर तब्बल दीड तासाने या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. 


सायरनचा आवाज अन् परिसरात खळबळ...


पडेगाव भागातील मिटमिटा परिसरात आग लागल्याने तत्काळ अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. मात्र आगीचे प्रमाण अधिक असल्याने घटनास्थळी तब्बल दहा अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. त्यामुळे एकामागून एक अशा सायरन वाजत येणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाड्या पाहून परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. तर नेमकं असे काय घडले असे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना प्रश्न पडत होता. 


नागरिकांची मदतीसाठी धाव...


जाधव मंडपच्या मिटमिटा भागात असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने धुराचे लोळ दूरपर्यंत पाहायला मिळत होते. त्यात अंधार असल्याने आग दूरुनच दिसून येत होती. तर आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मदत केली. तर काही नागरिकांनी गोडाऊनमधील सामान बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न देखील केला. पण आगीचे प्रमाण अधिक असल्याने सामान बाहेर काढण शक्य झाले नाही.


मोठ्याप्रमाणावर नुकसान! 


छत्रपती संभाजीनगर मधील जाधव मंडप नामांकित मंडप व्यवसायिक म्हणून ओळखले जातात. आपले साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी मिटमिटा परिसरात सात एकर परिसरात आपला गोडाऊन उभारला आहे. ज्यात मंडपाचे कापड, खुर्च्यांसह इतर साहित्य ठेवतात. दरम्यान सध्या सीजन नसल्याने त्यांचे गोडाऊनमध्ये मोठ्याप्रमाणावर सामान ठेवलेले होते. त्यामुळे आगीत मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. आगीत किती नुकसान झाले याचा आकडा अजूनही स्पष्ट झाला नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कुलिंग करण्यात येत होते. त्यानंतर आज पोलिसांकडून पंचनामा करण्यात आल्यावरच नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्यांना पोलिसांचा दणका; 60 जणांविरोधात गुन्हा दाखल, न्यायालयात खटलाही चालवणार