Shiv Sena Protest Aurangabad: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रामदास कदम यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये शिवसेनेच्यावतीने आज सकाळी गजानन महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. 


गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. राज्यभरात रामदास कदम यांच्याविरोधात शिवसेनेकडून आंदोलन केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून आज औरंगाबादमध्ये सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गजानन महाराज चौकात शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 


शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडले...


रामदास कदम यांच्याविरुद्ध विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडले. यावेळी या गद्दारांचे करायचे काय, खाली मुंडक वर पाय.. गद्दार रामदास कदम, हाय हाय.. नीम का पत्ता कडवा है, रामदास कदम *** है, या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडले. यावेळी पोलिसांकडून सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.