Digital Payment: देशात झालेल्या इंटरनेट (Internet) क्रांतीनंतर डीजीटल पेमेंटमध्ये (Digital Payment) मोठी वाढ झाली आहे. फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) सारखे पर्याय उपलब्ध झाल्याने बहुतेक लोकं खिशात पैसे ठेवण्याचा टाळत असतात. या  डीजीटल पेमेंटच्या क्रांतीचा परिणाम देशात जरी सकारात्मक पाहायला मिळत असला तरीही, याचा फटका हॉटेलमध्ये (Hotel) काम करणाऱ्या वेटर (Waiter) यांना बसत आहे. अनेकदा हॉटेलमध्ये जेवण केल्यावर ऑनलाइन (Online) आणि डीजीटल पेमंट करतांना वेटर यांना टीप दिली जात नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. 


यापूर्वी हॉटेलमध्ये जेवल्यानंतर रोख रक्कम (Cash Payment) देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे जेवणाचे बिल देतांना परत आलेले सुट्टे पैसे टीप म्हणून हॉटेलमधील वेटरला दिले जायचे. त्यामुळे अनेकदा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरला हॉटेल मालकाकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिकचे पैसे टीप म्हणून मिळत होते. त्यात अनेकदा मालक देखील वरील पैश्यातून टीप द्यायचे.  त्यामुळे पगाराच्या वेतेरिक्त वेटर यांना दोन पैसे अधिक मिळत होते. मात्र आता डीजीटल पेमेंटमुळे याचा फटका वेटरला बसत आहे. 


डीजीटल क्रांतीमुळे खिशातील पैसा मोबाईलच्या ॲपमध्ये आला. गुगल पे, फोन पे यासारख्या ॲपमुळे बरेचसे लोक खिशात पैसा बाळगत नाहीत. याचाच परिणाम हॉटेलमधील मिळणाऱ्या टीपवर होताना पाहायला मिळतोय. यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन डिजिटल पेमेंटमुळे नेमका काय परिणाम झाला आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्यात वेगवेगळी माहिती समोर आली. 


टीपवर 80 टक्के परिणाम 


सुरुवातीला आम्ही शहरातील निराला बाजारमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गेलो. तिथे वेटर असलेल्या साजनला (नाव बदललेलं) भेटलो. डीजीटल पेमंटमुळे टीपवर काय परिणाम झाला याबाबत त्याला विचारताच त्याने, ग्राहक हल्ली कॅश पेमेंट करण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचं सांगितले. तसेच बिल देतांना सोबत स्कॅनरही मागतात आणि जेवढे बिलाचे पैसे झाले तेवढेच स्कॅन करतात. त्यामुळे आमच्या टीपवर 80 टक्के परिणाम झाला असल्याची माहिती देखील साजनने दिली आहे. 


झोमॅटो, स्विगीवर टीपचा पर्याय... 


घरी बसल्या ऑनलाईन अन्नपदार्थ पुरवणाऱ्या झोमॅटो (Zomato), स्विगीसह (Swiggy) वेगवेगळ्या कंपन्यांनी आता टीपसाठीच पर्याय दिलाय. जेवणाची ऑर्डर (Food Order) दिल्यावर पेमंट करतानाच टीप देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुळात टीप देण्याचा पर्याय ऐच्छिक विषय आहे. पण अनेकदा कॅश पेमंट दिल्यावर सुट्टे पैसे परत आल्यावर ग्राहक वेटरला टीप द्यायचे. पण आता जेवढ बिल तवेढेच पैसे देण्याचा पर्याय डीजीटल पेमेंटमुळे उपलब्ध असल्याने, याचा फटका वेटरला बसत आहे.