Aurangabad News: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आले. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र गद्दारांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक केलं. त्यामुळे शिवसेना-शिंदे गटाच्या वादात आता राष्ट्रवादीने सुद्धा उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी अमोठ्या जल्लोषात अनावरण करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण हे गद्दारांचे हस्ते करण्यात आल्याचा आरोप करत, राष्ट्रवादीने शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केले. दुग्धाभिषेक केल्यावर आंदोलनकर्ते मात्र तेथून फरार झाले. 


पोलिसांचा बंदोबस्त


या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तर शिवरायांच्या पुतळ्याजवळ शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अचानक झालेल्या या आंदोलनाची पोलिसाना सुद्धा कल्पना नव्हती. त्यामुळे आता विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. 


यापूर्वी शिवसेनेकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण


यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना, बिडकीन येथे त्यांनी भव्य अशी रॅली काढली होती. मात्र ज्याठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी रॅली काढली होती, त्या रस्त्यावर शिवसेनेकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले होते. त्यात आता राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या विरोधात शिवसेनेबरोबरच आता राष्ट्रवादीने सुद्धा दंड ठोकले आहे. 


पत्रिकेत दानवेंच नाव डावलले...


विद्यापीठ परिसरात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी छापण्यात आलेल्या शासकीय निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव डावलण्यात आले होते. त्यामुळे दानवे यांनी कुलगुरू डॉं. प्रमोद येवले यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल केले आहे. तर आज दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 


महत्वाच्या बातम्या... 


पत्रिकेत नाव डावलल्यानंतर दानवे विद्यापीठात; कुलगुरुंविरोधात हक्कभंग, कुलगुरू म्हणतात 'नो कमेंट' 


मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम अन् राजकारण; मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील काय घोषणा?