Aurangabad News: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वर्षातून चार वेळा मतदार पुनःनिरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार सध्या औरंगाबाद जिल्ह्यात हा मतदार नोंदणी संक्षिप्त पुनःनिरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मात्र याचवेळी तब्बल 1 लाख 2 हजार 229 एकसारखेच चेहरे असलेले मतदार आढळले आहेत. त्यामुळे आता या मतदारांची निवडणूक विभागाकडून पडताळणी सुरु आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात एकसारखे नाव आणि फोटो असलेल्या मतदारांची नावे नुकतीच मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. मात्र आता वेगवेगळे नावं असलेले पण सारखेच चेहरे असलेले 1 लाख 2 हजार 229 मतदार आढळले आहेत. त्यामुळे या सर्वांची सध्या पडताळणी सुरू असून, यात एकाच मतदाराचे दोन वेगवेगळे कार्ड असल्याचे आढळून आल्यास ती नावे यादीतून वगळण्यात येतील, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम यांनी माध्यमांना दिली आहे.
असा आला सर्व प्रकार समोर...
सध्या जिल्ह्यात हा मतदार नोंदणी संक्षिप्त पुनःनिरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमादरम्यान फोटोंमध्ये साम्य असणाच्या मतदारांची नावे पुढे आली आहेत. ज्यात नाव वेगवेगळे असले, तरी फोटोमध्ये बहुतांश प्रमाणात साम्य आढळले आहे. एकसारखे चेहरे असलेले असे 1 लाख 2 हजार 229 मतदार आहेत. त्यांच्या चेहऱ्यांची सूक्ष्मरीत्या पडताळणी केली जात आहे. यात बीएलओ प्रत्यक्ष या मतदारांची भेट घेऊन ते वेगवेगळे आहेत का, याची खात्री करणार आहेत. जर एकाच व्यक्तीचे दोन कार्ड असतील, तर ते रद्द केले जाणार आहेत.
पडताळणी सुरु...
यापूर्वी झालेल्या मतदार पुन: निरीक्षण कार्यक्रमात सारखी नावे, सारखे चेहरे असलेल्या अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. अजूनही अशा मतदारांचा शोध सुरूच आहे. त्यातूनच हा सारख्या चेहऱ्यांचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आता त्यांची देखील पडताळणी सुरु असून, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
बोगस मतदानाची भीती...
सद्या ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून, लवकरच जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत अनेकदा बोगस मतदान केल्याचे प्रकार देखील समोर येतात. ज्यात एकाच नावाचे दोन मतदान ओळखपत्र, एक सारखे चेहेरे असलेले ओळखपत्राचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने पाऊले उचलेले असून, वर्षातून चार वेळा मतदार पुनःनिरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.