Aurangabad News: एकीकडे जायकवाडी धरणातून दोन वेळा पाणी सोडण्याची वेळ आली असतांना, दुसरीकडे औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न काही सुटता सुटत नसल्याचे चित्र कायम आहे. औरंगाबाद खंडपीठात यावर बुधवारी सुनावणी झाली. यादरम्यान खंडपीठाने महानगरपालिका प्रशासनाचे कान टोचल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबादकरांना दिवाळीपर्यंत तरी दोन-तीन दिवसांआड पाणी द्या अशी अपेक्षा व्यक्त करत न्यायालयाने महापालिकेचे कान टोचले. 


बुधवारी औरंगाबाद खंडपीठात औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर सुनावणी झाली. यादरम्यान शहरातील बेकायदा नळ कनेक्शनच्या मुद्यावरून न्यायालयाने महापालिकेला कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर एक लाख बेकायदा नळ कनेक्शन असतांना फक्त 428 वरच का कारवाई केली  असा प्रश्न सुद्धा न्यायालयाने उपस्थित केला. तर औरंगाबादकरांना दिवाळीपर्यंत तरी दोन-तीन दिवसांआड पाणी द्या असे म्हणत मनपाचे कान टोचले. 


पाणी प्रश्न कधी सुटणार...


गेली अनेक वर्षे औरंगाबादकर पाणी प्रश्नाला तोंड देत आहेत. उन्हाळ्यात तर अनेक भागात दहा ते बारा दिवस नळाला पाणीच येत नाही. काही वस्त्यांमध्ये तर पाणीच पोहचत नसल्याने त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. राज्यातील राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू ठरलेल्या औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्न मिटवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रमाणिक प्रयत्न कधी केलाच नसल्याचा आरोप नागरिक करतात. त्यामुळे पाणी प्रश्न मिटवण्यासाठी नेतेमंडळी आणि प्रशासन अपयशी ठरत असल्याने आता खंडपीठानेच पुढाकार घेतला आहे. 


निवडणुकीत कळीचा मुद्दा...


औरंगाबादच्या प्रत्येक निवडणुकीत शहरातील पाणी प्रश्न कळीचा मुद्दा ठरतो.  विशेष करून महानगरपालिका निवडणूक तोंडावर आल्यावर यावरून राजकीय वातवरण तापतांनाचे चित्र पाहायला मिळते. तर सर्वच पक्षांकडून पाणी प्रश्न मार्ग लावण्याचे आश्वासन दिले जातात. जाहीरनाम्यात सुद्धा पाणी प्रश्न प्रामुख्याने पाहायला मिळतो. मात्र असे असतांना देखील गेली कित्येक वर्षे औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. 


पाच मंत्री असतांना पाणी प्रश्न सुटणार का?


नुकत्याच झालेल्या शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळ विस्तारात औरंगाबादला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत. तर यापूर्वी दोन केंद्रीय मंत्रिपद औरंगाबादकडे आहेत. त्यातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा औरंगाबादला मिळाले आहे. त्यामुळे एवढ सर्व असतांना किमान आतातरी औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न सुटेल का? असा प्रश्न शहारतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.