Aurangabad News: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या औरंगाबादच्या नामांतरच्या मुद्यावरून जलील यांनी लोकसभेत केलेल्या भाषणातून सरकारवर निशाणा साधला. शेतकरी आत्महत्या वाढत असून, बळीराजा खाजगी सावकरांच्या दबावाखाली आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. मात्र असे असतांना शेतकऱ्यांच्या मुद्यांपेक्षा नामांतराच्या मुद्द्यांना अधिक महत्व दिले जात असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 


यावेळी लोकसभेत बोलतांना जलील म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी सरकार काय करत आहेत, याबाबत संसदेत आम्ही खूप मोठ-मोठ्या गप्पा आयकल्या आहेत. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जानेवारी 2022 ते जुलै 2022 पर्यंत तब्बल चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. मला आजही आठवत आहे की, जेव्हा सरकार स्थापन झालं, त्यावेळी देशातील शेतकरी आत्महत्या पूर्णपणे संपवले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते.


देशातील एका छोट्याशा औरंगाबाद शहरात सात महिन्यात चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्याचे कारण काय आहे. त्याचे कारण म्हणजे, बँका शेतकऱ्यांना मदत करत नसल्याने त्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्यासाठी जावे लागत आहे. तर खाजगी सावकार 25 ते 32 टक्के व्याज्याने शेतकऱ्यांना कर्ज देत आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर व्याज असल्याने शेतकरी ते परत करू शकत नाही आणि आत्महत्या शिवाय त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. त्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला असून, त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे की, लवकरात लवकर या आत्महत्यांचे कारणं शोधली गेली पाहिजे. 


नामांतरावरून साधला निशाणा...


शेतकरी आत्महत्याचा मुद्दा लोकसभेत मांडतांना जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दाही आपल्या भाषणातून उपस्थित केला. शेतकरी आत्महत्या होत असून, हे मुद्दे महत्वाचे असून, त्यापेक्षा नामांतराचे मुद्दे महत्वाचे नाहीत. औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करणे महत्वाचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याचं आम्ही आदर करतो, मात्र नामांतराच्या मुद्यांपेक्षा शेतकऱ्यांचे मुद्दे महत्वाचे असल्याच जलील म्हणाले.