Corona Vaccination: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भयंकर परिस्थिती देशभरात पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होताच लसीकरणाची (Vaccination) मोहीम देखील मंदावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती मराठवाड्यात (Marathwada) देखील दिसून येत आहे. कारण कोरोनाची तीव्रता कमी होताच मराठवाड्यात प्रतिबंधक लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 83.96 टक्के नागरिकांनी पहिला, तर 68 टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर तिसऱ्या लाटेदरम्यान सुरू केलेल्या बूस्टर डोसला (Booster Dose) अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, केवळ 10 टक्केच लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय यंत्रणेने मोहीम राबवूनही एकाही डोसचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यात यंत्रणांना यश आले नाही. 

देशभरात पहिल्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असताना मराठवाड्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) आढळून आला. त्यानंतर विभागातील इतर  जिल्ह्यांत सुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढून दोन वर्षांत 18 हजारांहून अधिक नागरिक या महामारीमुळे मृत्यू पावले. मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. विभागात अजूनही 25 लाखांहून नागरिकांनी कोरोनाचा पहिला डोसच घेतला नाही, तर 50 लाखांहून अधिक जणांनी दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीहून स्पष्ट होते. तर नागरिकांना महामारीपासून बचावासाठी शासनाने मोफत लसीकरण सुविधा सुरू केली, परंतु जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे ही लसीकरण मोहीम अपयशीच ठरली आहे. 

नागरिकांचे लसीकरणाकडे दुर्लक्ष...

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत मराठवाड्यातील आठही जिल्हे मागे आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विभागात केवळ दहा लाख नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला, तर तब्बल 1.40 कोटी नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, लसीकरणात लातूर आरोग्य उपसंचालक विभाग मागे असून, प्रत्यक्षात किती नागरिकांना डोस देण्यात यश आले, याबाबतची अद्ययावत माहितीदेखील या विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.

लसीकरण आकडेवारी! 

जिल्हा  पहिला डोस  दुसरा डोस  बूस्टर  डोस 
औरंगाबाद  95 टक्के  75 टक्के  08 टक्के 
जालना  82 टक्के  72 टक्के  06 टक्के 
परभणी  80 टक्के  64 टक्के  06 टक्के 
हिंगोली  87 टक्के  76 टक्के  08 टक्के 

संबंधित बातम्या: 

Corona Vaccination: लसीकरणासंदर्भात मोठी बातमी! आता गल्लीबोळात असलेल्या औषध दुकानातूनही लसीकरण शक्य!