Aurangabad News: औरंगाबाद शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील क्रांती चौक येथे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी 50 खोके महागाई एकदम ओके अशा घोषणा देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात गुवाहाटी येथील चित्र रेखाटण्यात आले होते. 


आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहारातील क्रांती चौक येथे राष्ट्रवादीचं आंदोलन पार पडलं. यात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून सोडले. तर आंदोलकांनी यावेळी 50 खोके महागाई एकदम ओके, जनता भरती जीएसटी गद्दार जातात गुवाहाटी, महागाई कशासाठी आमदारांच्या खरेदीसाठी, महागाईने दुखते डोके, गद्दारांना 50 खोके 50 खोके, बहुत हो गई महागाई की मार चलो हटा मोदी सरकार, अशा घोषणा दिल्या. 


क्रांती चौकात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी गुवाहाटी येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेल समोरील झाडे आणि डोंगराचे चित्र काढून देखावा सादर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील 40 आमदार नाराज होऊन आसाम येथील गुवाहाटीला गेले होते. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांचे 'काय झाडी काय डोंगर' हे वाक्य चर्चेत आले होते. त्याच धाग्याला पकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी गुवाहाटीचा देखावा सादर करत सरकारवर टीका केली.


आमदार फोडण्यासाठी खोके पुरवले जातायत...


यावेळी बोलतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख म्हणाले की, केंद्र सरकराने मागील काही काळात छोट्या-छोट्या गोष्टींवर जीएसटी लावले आहे. महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम भाजपकडून होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर दरोडा टाकून हा पैसा कुणाच्या खिशात जात आहे. यावेळी असे लक्षात येत आहे की, हा सर्व पैसा विरोधी पक्षाच्या आमदारांना खोके देण्यात जात असल्याचा आरोप शेख यांनी केला. 


खोक्याच्या माध्यमातून हा पैसा महाराष्ट्रात आमदार फोडण्यासाठी वापराला गेला आहे. दिल्लीत सुद्धा वीस-वीस खोक्याच्या माध्यमातून हा पैसा वापरला जात आहे. त्यातच आता झारखंडमध्ये हे लोकं आता खोके घेऊन फिरत आहे. लोकांच्या महागाईतून जमा झालेला पैसा आमदार फोडण्याचा जो प्रयत्न सुरु त्याच्या विरोधातच आजचे आंदोलन करण्यात आले असल्याच महेबुब शेख म्हणाले.