Aurangabad News : सर्वत्र आज शिक्षक दिन साजरा (Teachers Day 2022) केला जात आहे. मात्र यावर्षी शिक्षक दिनाची वेगळी चर्चा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार आणि शिक्षक यांच्यात सुरु असलेला वाद आता शिगेला पोहचला आहे. त्यातच आता आमदार बंब यांनी राज्यभरातील मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची माहिती गोळा करायला सुरवात केली आहे. त्यामुळे शिक्षक आणि आमदार बंब यांच्यातील वाद आणखीच वाढण्याची शक्यता आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी राज्यभरातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शालेय समिती अध्यक्ष-सदस्य, पालक आणि गावातील नागरिकांच्या नावाने एक पत्र काढले आहे. ज्यात आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील जे शिक्षक मुख्यालयी राहत नसतील त्यांचे गावाच्या नावासह माहिती मेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आमदार बंब यांच्याकडून आता राज्यभरातील मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता यावरून वाद आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
तर शिक्षकांचे पूजन करा...
गावकऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून आमदार बंब यांनी आणखीन एक मागणी केली आहे. ज्यात त्यांनी म्हंटले आहे की, आपल्या गावांतील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकांबद्दल येत्या 5 सप्टेंबर रोजी अर्थात शिक्षक दिनानिमित्त गावांत मुख्यालयी राहत असलेल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षीका व शिक्षकांचे पुजन करुन, कृतज्ञता व्यक्त करण्याची विनंती बंब यांनी केली आहे.
वाद आणखीच वाढणार...
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून, आमदार बंब यांनी थेट कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आले आहे. अशात आमदार बंब आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यातच आता त्यांनी गावागावातील मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे वाद आता आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
शिक्षक-पदवीधर मतदारसंघ बंद करण्याची मागणी...
शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक-पदवीधर मतदारसंघ सुद्धा बंद करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांच्या चुकीच्या कामांना शिक्षक आणि पदवीधर आमदारांचा पाठींबा असतो. त्यामुळे त्यांची हिम्मत वाढत असल्याचा आरोप बंब यांनी केला आहे. त्यात आता सर्वच आमदार सुशिक्षित असल्याने या मतदारसंघाची आता गरज उरली नसल्याचा म्हणत बंब यांनी हे मतदारसंघ बंद करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI