Aurangabad News: अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीतून ज्याप्रमाणे भाजपने (BJP) माघार घेतली आहे, त्याचा एकच अर्थ होतो ते म्हणजे भाजपची फाटली असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजपकडून उत्तर देण्यात आला आहे. भाजपचे नेते तथा माजी औरंगाबादचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी जलील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जलील यांचे शिवसेनेबाबत प्रेम अधिकच वाढले असल्याने ते भारतीय जनता पार्टीवर टीका करत असल्याचं राठोड यांनी म्हंटले आहे.
यावेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना राठोड म्हणाले की, संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त औरंगाबादचे खासदार असलेले इम्तियाज जलील यांनी भाजपची फाटली असे जे वक्तव्य केले आहे, ते अतिशय चुकीचे आहे. कारण काही दिवसांपासून जलील यांचे शिवसेनेवरील प्रेम अधिकच वाढलेले असून, हे सर्वानाच माहित आहे. तसेच शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवडून आणण्यासाठी एमआयएमने जे मतदान करून मदत केली होती ती संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे.
पुढे बोलतांना राठोड म्हणाले की, जलील यांची जी शेवटची खासदारकी आहे, ती त्यांनी एन्जॉय करावी. कारण 2024 मध्ये नक्कीच त्यांची फाटणार असून, औरंगाबादच्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा भगवा फडकणार आहे. तसेच जलील यांचे शिवसेनेवरील प्रेम सर्वांना दिसत आहे. ज्या भाषेचा वापर जलील करत आहेत ती शिवसेनेची आहे. महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे त्या पद्धतीने भाजप काम करत असल्याने, या सर्वांच्या मनात रुचत आहे. आपली शेवटची खासदारकीची संधी असल्याने निराशापोटी जलील असे विधान करत असल्याचं राठोड म्हणाले आहेत.
MIM शिवसेनेची बी टीम...
एमआयएमला भाजपची बी टीम म्हणले जातं यावर बोलतांना राठोड म्हणाले की, बी टीम वैगरे बोलणं चुकीचे असून, भाजपची अशी कोणतेही बी टीम नाही. मात्र एमआयएम गेल्या काही दिवसांत काय करत आलंय हे सर्व औरंगाबादकरांना माहित आहे. याचं उदाहरण म्हणजे दानवे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत MIM च्या सर्व नगरसेवकांनी मतदान केले होते. त्यामुळे कुणाचे कुणावर प्रेम आहे आणि MIM कुणाची बी टीम आहे हे आता स्पष्टच असल्याचे सुद्धा राठोड म्हणाले.
संबंधित बातमी...
Imtiaz Jaleel: तर यामुळे भाजपने निवडणुकीत माघार घेतली, जलील यांनी सांगितले कारण...