Sanjay Shirsat: निवडणूक आयोगानं (Election Commission) शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याविरुद्ध ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान यावर आज सुनावणी झाली असून, पुढील दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. मात्र ठाकरे गटावर आम्ही आजही व्हिप लागू करू शकतो, फक्त अपात्रतेबाबत कारवाई करू शकत नसल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.
याबाबत बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान अनेकजण म्हणत आहे की ठाकरे गटाला व्हिप लागू होणार नाही. मात्र असे नसून, व्हिप लागू करणे आणि कारवाई करणे हे दोन वेगवेगळे विषय आहे. फक्त त्यांच्यावर कारवाई करू नये असा विषय आहे. आमच्या वकिलांनी दोन आठवडे कारवाई करणार नसल्याचं न्यायालयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिवेशनात आम्ही व्हिप लागू करू शकतो, फक्त कारवाई करू शकत नसल्याचे शिरसाट म्हणाले.
कारवाईमुळे होणाऱ्या त्रासाची ठाकरे गटाला भीती
तसेच पुढे होणाऱ्या अधिवेशनात आम्ही जर व्हिप बजावला आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामाची ठाकरे गटाला भीती होती. त्यावर आमच्या वकिलांनी स्पष्ट सांगितले आहे की, आम्ही कोणत्याही प्रकारे अशा कारवाईचा निर्णय घेणार नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की, व्हिप लागू करणार नाही. व्हिप लागू केला तरीही यावर कारवाई कधी करायची याची कालमर्यादा ठरलेली नसती. त्यामुळे आजही व्हिप लागू केला आणि कारवाई दोन महिन्यांनी करायचं ठरवलं तरीही त्यावेळी व्हीपचं उल्लंघन केल्याचा नियम लागू होतो.
निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती नाहीच...
पुढे बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आज झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने अत्यंत बॅलेन्स निर्णय घेतला आहे. तर निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने जो काही निर्णय दिला आहे, त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. तसेच ठाकरे गटाची काहीही अडचण असल्यास ते सुप्रीम कोर्टात येऊ शकतात असेही सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती देण्याचा ठाकरे गटाचा जो मूळ मुद्दा होता, त्याला न्यायालयाने फेटाळून लावलं असल्याचं शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Politics : पक्ष आणि चिन्हावर कोर्टात काय झालं? जाणून घ्या A टू Z माहिती