Electricity News: जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे वीज कनेक्शन (Electricity Connection) नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी मोठी किचकट आता दूर होणार आहे. कारण आता जुन्या मालकाच्या नावावर असलेला मीटर आपोआप नवीन मालकाच्या नावावर होणार आहे. त्यासाठी शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारण्याची गरज पडणार नाही. यापुढे नावात बदल करण्यासाठी महावितरणने (Mahavitaran) नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केल्याची माहिती महाविरतणच्या वतीने देण्यात आली.


एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर तेथील विद्युत कनेक्शन ती वास्तू खरेदी करणाऱ्यांच्या नावावर करण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होत असते. त्यामुळे ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ असल्याने अनेकांना महावितरण कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. आता घर खरेदी करणाऱ्यांची धावपळ थांबवणार असून, नव्या सिस्टमनुसार आपोआपच विद्युत कनेक्शन घर खरेदी करणाऱ्याच्या नावावर होणार आहे.


अशी असणार प्रकिया...


दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाईनही भरू शकतो. फी भरली, की विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते. या व्यवस्थेमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


वेळ वाचणार... 


यापूर्वी घर किंवा दुकान विकल्यावर घर जरी आपल्या नावावर झाले तरीही वीज मीटर जुन्या मालकाच्या नावावर राहायचे. तसेच तो मीटर नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी अर्ज करावा लागत होता. तसेच अनेक कागदपत्रे दाखल केल्यावर शासकीय कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे यात खूप वेळ जायचा. पण महावितरणकडून देण्यात येत असलेल्या नवीन सोयीनुसार सर्व प्रकिया ऑनलाईन असणार असून, शुल्क देखील  ऑनलाईन भरावी लागणार आहे. त्यामुळे यात वेळ तर वाचणारच पण तुम्ही कुठेही बसून यासाठी अर्ज करू शकणार आहे. त्यामुळे याचा मोठा दिलास नागरिकांना मिळणार आहे. 


BJP MLA Threat : भाजप आमदारांचं फोन संभाषण व्हायरल, महावितरणच्या अभियंत्याला अधिवेशनात निलंबित करण्याची धमकी