Rain News: परतीच्या पावसाने पुन्हा एकदा मराठवाड्यात दाणादाण उडविली आहे. कारण मागील सात दिवसांत 34 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर सोमवारी 10 मंडळात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विभागात 450 पैकी 285 मंडळात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पीकं हातचे गेले असून, सरकराने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत.
मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात आजवर 95 मि.मी. पाऊस झाला आहे. विभागाच्या 379 वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 771 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मागील सात दिवसांत पुन्हा 34 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सुरवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाने झोडून काढलं आहे.
या भागात अतिवृष्टी (17 ऑक्टोबर 2022)
- 17 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळात 70 मि.मी. पावसाची नोंद झाली.
- जालना जिल्ह्यात राजूर, केदारखेडा, जाफराबाद, कुंभारझरी, रामनगर, टेंभुर्णी या सर्व मंडळात प्रत्येक 75 मि.मी. पावसाची नोंद झाली.
- बीड जिल्ह्यातील गंगामसला मंडळात 79 तर केजमधील नांदूरघाट मंडळात 66 मि.मी. पावसाची नोंद झाली.
- उस्मानाबादमधील केशगाव मंडळात 66 मि.मी. पाऊस झाला.
औरंगाबादमध्ये पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान...
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असल्याचे चित्र आहे. काढणीला सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर वेचणीला आलेला कापूस देखील ओला होत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे आता पंचनामे न करता सरकराने सरसकट मदतीची घोषणा करावी अशी मागणी शेतकरी करतायत.
येलदरी-दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग
परभणी जिल्ह्यातील येलदरी-दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. येलदरी धरणाचे सोमवारी चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. या चारही दरवाज्यातून 1 हजार 648 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर लोअर दुधना धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहे. लोअर दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे 0.30 मीटरने उचलण्यात आले असून, त्यातून 1 हजार 2120 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
संबंधित बातमी...