Cotton Manufacturers farmers in trouble: यंदाच्या खरिपाच्या हंगामात औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर कपाशीची लागवड केली आहे. मात्र आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कपाशी पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नवीन संकट उभं राहिलं आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात आणि कपाशी पिके फुलावर असतांना माव्याच्या प्रादुर्भावाने हिरवीगार असलेली कपाशी पिकांचा रंगच बदलला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
औरंगाबादच्या एकट्या सोयगाव तालुक्यात यंदा तब्बल 35 हजार 325 हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी 30 हजार 115 हेक्टरवरील कपाशी पिकांना माव्याचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सोयगाव तालुक्यात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महागडी कीटकनाशक फवारणी करूनही मावा नियंत्रणात येत नसल्याने, बळीराजाची चिंता लागली आहे.
कृषी विभागाचं दुर्लक्ष...
सोयगाव तालुक्यात ठिबक सिंचानावरील कपाशी लागवडी क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे,परंतु सोयगाव तालुक्यात अचानक बदलत्या ढगाळ वातावरण आणि पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे कपाशी पिकांवर ताण पडला असून ढगाळ वातावरण माव्या साठी पोषक ठरत आहे. यावर मार्गदर्शनासाठी तालुका कृषी विभाग पुढे येत नसून तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कोणताही मार्ग मिळत नसल्याने माव्याच्या प्रादुर्भावात शेतकऱ्यांचा कोट्यावधी रुपये फवारणीमध्ये जात आहे.
उत्पन्नात घट होणार
विशेष म्हणजे महागडी कीटकनाशक फवारणी करूनही कोणताही उपयोग होत नाहीये. त्यामुळे माव्यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्ग सुचत नसल्याने मोठी चिंता पसरली आहे. माव्याच्या प्रादुर्भावामुळे ऐन फुल पात्यावर आलेल्या कपाशी पिकांची फुलगळती वाढली आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात यंदा कपाशीच्या उत्पन्नात घट होणार असल्याची शक्यता आहे.
जिल्हाभरात अशीच परिस्थिती...
फक्त सोयगावचं नाही तर जिल्ह्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत असून, कृषी विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषीमंत्री औरंगाबाद जिल्ह्यातील असतांना अशी परिस्थिती असेल तर राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विचार न केलेलाच बरा म्हणावा लागेल.
महत्वाच्या बातम्या...
Photo:शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तहसीलदारांचे बैलगाडीतून पंचनामे