Aurangabad News: पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करावे आणि माहिती भरण्यासाठी नवीन मोबाईल देण्याची मागणी करत अंगणवाडी सेविकांनी ॲपवर माहिती भरण्यावर दीड वर्षांपासून बहिष्कार टाकला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने देखील आदेश देतांना, अशाप्रकारे अंगणवाडी सेविकांवर प्रशासनाने सक्ती करू नयेत असे आदेश दिले आहे. मात्र असे असतांना देखील औरंगाबाद जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपवर बालकांची माहिती भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य परिषद सदस्या शालिनी पगारे यांनी केला आहे. तर या विरोधात आज औरंगाबादच्या जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांच्या दालनासमोर अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 


विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाच्यावतीने आज औरंगाबादच्या जिल्हा परिषदेत निदर्शने करण्यात आले.  यावेळी अंगणवाडी सेविकांनी सीईओ यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली. तर सीईओ यांच्या दालनाबाहेर दोन तास थांबून देखील त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. 


पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरण्यास अंगणवाडी सेविकांवर सक्ती न करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. असे असताना एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तथा औरंगाबाद जिल्हा परिषेदकडून अंगणवाडी सेविकांवर माहिती भरण्यासाठी दबावतंत्र वापरून काम करण्यास सांगितले जात आहे. तर याला विरोध केल्यास अंगणवाडी सेविकांना निलंबित करण्याची नोटीसा दिल्या जात आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका तणावाखाली असल्याचं आरोप यावेळी आलेल्या शिष्टमंडळाने केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर न्यायालयाचे आदेशाबाबत जाणीव करून देण्यासाठी सीईओची भेट घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे शिष्टमंडळाने सीईओंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी भेट न दिल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये संताप पाहायला मिळाला. 


यामुळे पोषण ट्रॅकरला विरोध 


केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने पोषण ट्रॅकर ॲप संचालित केले जाते. या ॲपमध्ये मराठी भाषा सोडून इतर भाषांचे पर्याय ठेवण्यात आले. यामध्ये शून्य ते सहा वर्षाच्या लाभार्थ्यांच्या आधारसह वजन उंची, गरोदर स्तनदा माता यांची माहिती भरण्यात येते. मात्र मराठी भाषे अभावी माहिती भरण्यास अंगणवाडी सेविकांना अडचणी येतात. त्यातच देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याने चालत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत माहिती भरायची कशात असा सवाल अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे.