BPMS Website Closed: राज्यातील सर्व महापालिका (Municipal Corporation) आणि नगरपालिकांमध्ये (Municipality) बांधकाम परवानग्यांसाठी महाआयटीने (MahaIT) तयार केलेली बीपीएमएस (Building Plan Management System) ही ऑनलाइन सिस्टीम सहा दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो बांधकाम परवानग्या (Construction Permission) रखडल्या आहेत. तर एकट्या औरंगाबाद महापालिकेत (Aurangabad Municipal Corporation) गेल्या सहा दिवसांत पन्नासहून अधिक बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
यापूर्वी महापालिका आणि नगरपालिकांमधून मिळणारी बांधकाम परवानगी ऑफलाइन पद्धतीने दिली जात होती. मात्र नागरिकांना बांधकाम परवनागी सहज आणि वेळेत उपलब्ध व्हावे या हेतूने ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. त्यासाठी बीपीएमएस वेबसाइट (https://www.mahavastu.maharashtra.gov.in) नगरविकास विभागाने 1 एप्रिल 2022 पासून सुरू केली. मात्र या वेबसाईटमध्ये काही त्रुटी येऊ लागल्याचे समोर आले. तर साइटमधील त्रुटी काढण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण या त्रुटी काही दूर झाल्या नाहीत, मात्र 21 डिसेंबरपासून बीपीएमएस साइटच बंद पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आर्किटेक्टकडून (Architect) बांधकाम परवानग्या अपलोड होणे बंद झाले आहे.
'या' अडचणीचा सामना करावा लागतोय
जुलै 2022 पासून सक्तीने महाआयटीने तयार केलेल्या बीपीएमएस साइटवरच आर्किटेक्ट (वास्तुविशारद) यांना बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करावी लागत आहे. पण साइटवर बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करतांना अनेक अडचणी येत होत्या. साइट स्लो चालणे, नेटवर्क न मिळणे, बांधकामाचे मोठे ड्रॉइंग अपलोड न होणे, वारंवार साइट हँग होणे अशा तक्रारी आहेत. अशातच आता 21 डिसेंबरपासून बीपीएमएस साइटच बंद पडल्यामुळे आर्किटेक्टकडून बांधकाम परवानग्या अपलोड होणे बंद झाले आहे.
बांधकाम परवानगी देणारी यंत्रणा कोलमडली...
बीपीएमएस वेबसाईट बंद पडल्याने राज्यभरातील बांधकाम परवानगी देणारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. कारण बीपीएमएस साइटवरच बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करण्याचे आदेश असल्याने सद्या बहुतांश ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने परवानगी देणं बंद आहे. त्यामुळे राज्यातील मनपा आणि नगरपालिकांमधील अभियंते, सहायक कर्मचारी, अभियंते, उपअभियंते, कार्यकारी अभियंता यांचे ऑनलाइन बांधकाम परवानगी देण्याचे काम ठप्प झाले आहे. औरंगाबाद महापालिकेतही गेल्या सहा दिवसांत सुमारे पन्नास बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, पण...